
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रवासी वाहन म्हणजे एसटी, ग्रामीण भागातील जनतेची रक्तवाहिनी समजली जाणारी एसटी आत्ता कुठे कात टाकतेय असं दिसत असतानाच एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मागणी केलेल्या निधीपैकी थोडीच रक्कम सरकारकडून आल्यामुळे मार्चचा पगार ५६ टक्के एवढाच झाला यावरून कर्मचारी वर्गातून नाराजीचा सूर उमटला.
मात्र कर्मचाऱ्यांचे पगार वाढीसाठी रस्त्यावर उतरणारे मंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा काढणारे सत्ताधारी पक्षातील नेतेच गायब आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने यात हस्तक्षेप केल्याचे दिसून आले. ‘यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या सात तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल’, असे आश्वासनही सरनाईक यांनी दिले. पण या प्रकरणात आणखी एक मुद्दा समोर आला.
एरवी तावातावाने बोलणारे एसटी कर्मचाऱ्यांचे नेते गेले कुठे? –
एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कामगारांचे मोठे आंदोलन महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडवून आणले. बेताल वक्तव्ये करत सदावर्ते यांनी त्या काळात एसटी कर्मचाऱ्यांसोबत राज्यातील जनताही वेठीस धरली होती. सध्याही गुणरत्न सदावर्ते विविध मुद्यांवर भाष्य करत आहेत. पण एसटी कर्मचाऱ्यांचा पगार ५६ टक्के एवढाच झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सदावर्ते
यांनी काय भूमिका घेतली?
ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी सदावर्ते यांचे नेतृत्व मान्य करून आंदोलन पुकारले, तेच आता सदावर्ते यांच्याविषयी नाराज झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४४ टक्के कपात झाली तरीही सदावर्ते यांनी आवाज उठवला नाही, याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
सदावर्ते यांच्यासह शेतकरी नेते सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर हेदेखील मैदानात उतरले होते. आता मात्र तेही शांत आहेत. काहीतरी आपल्या पदरात पडेल, या आशेने आंदोलनात उतरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. या कर्मचाऱ्यांना आता वाली कोण, अशी अवस्था निर्माण झाली आहे.