
मुंबई प्रतिनिधी
शिवसेना (उबाठा) पक्षाने अधिकृत प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर केली आहे. मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर सहा जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांमध्ये मांडण्यासाठी त्यांना अधिकृत करण्यात आले आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्व शिवसेना नेते पक्षाची भूमिका वेळोवेळी मांडत असतात, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सुषमा अंधारे आणि जयश्री शेळके, प्रियांका चतुर्वेदी यांच्याकडे मोठी जबाबदारी
उद्धव ठाकरेंसाठी ठाम भूमिका घेणाऱ्या आणि कायमच आक्रमक पवित्रा घेत आलेल्या सुषमा अंधारे याना मोठी जबाबदारी मिळाल्याने त्यांचं पक्षातील स्थान आणखी मजबूत झालं आहे. त्याचप्रमाणे जयश्री शेळके यांचाही प्रवक्त्यांच्या यादीत समावेश झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात बचत गट चळवळीतून महिलांसाठी मोठे कार्य करणाऱ्या शेळके या २०२४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार होत्या. अवघ्या ८४१ मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला.
दुसरीकडे प्रियांका चतुर्वेदी यांच्या कुटुंबाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. प्रोफेशनल पीआर म्हणून काम करणाऱ्या प्रियांका सामाजिक कार्यातून पुढे स्तंभलेखिका आणि नंतर राजकारणात आल्या. राजकारणात येण्यापूर्वी प्रियांका चतुर्वेदी एका मीडिया कंपनीत संचालक म्हणून काम करत होत्या. ब्लॉग लिहून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या प्रसिद्धीनंतर २०१० साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय प्रवक्तेपदापर्यंत मजल मारली होती. मात्र, २०१९ साली पक्षात मतभेद झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला आणि त्याच वर्षी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मुख्यप्रवक्ते-
– खासदार संजय राऊत
– खासदार अरविंद सावंत
प्रवक्ते-
– शिवसेना नेते अॅड. अनिल परब
– शिवसेना उपनेता प्रियंका चतुर्वेदी
– शिवसेना जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान
– शिवसेना उपनेता सुषमा अंधारे
– आनंद दुबे
– जयश्री शेळके
पत्रात नेमकं काय म्हंटलंय?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहेत, तर इतर सहा जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांमध्ये मांडण्यासाठी त्यांना अधिकृत करण्यात आले आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्व शिवसेना नेते पक्षाची भूमिका वेळोवेळी मांडत असतात, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.