
मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची मंगळवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने राज्यातील पाच ‘आयएएस’ अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता चंद्रकांत डांगे हे महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील. तर संजय काटकर यांची बदली महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम यांच्याकडे अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसंच हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
‘केडीएमसी’च्या आयुक्तपदा कारभार मागील 3 वर्षांपासून इंदुराणी जाखड पाहत होत्या. पण त्यांची 1 एप्रिलला पालघर जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली. त्यानंतर केडीएमसी महापालिकेच्या आयुक्तपदी कोणीची वर्णी लागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
मात्र, अखेर आता जाखड यांच्या बदलीनंतर महापालिकेचा कारभार अभिनव गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, गडचिरोली जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या आयएएस आयुषी सिंह यांची नागपूर अतिरिक्त आदिवासी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या बदलीच्या निर्णयाची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे.