
मुंबई प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्यात भ्रष्टाचार झाला आहे. या खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच शासकीय तिजोरीवर डल्ला मारला असल्याचे प्रकार उघडकीस आला आहे.
या अधिकाऱ्यांनी परस्पर शासन निर्णय काढून कोट्यवधी रुपये स्वत:च्या बॅक खात्यात वळवले असल्याबद्दल ‘कॅग’ ने ताशेरे ओढले आहेत.
अशी माहिती देत याप्रकरणी चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे.
सुनील माने यांनी सोमवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी बांधकाम विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. बांधकाम विभागाला विविध कामांचे जे शुल्क मिळते, ते सर्वच सरकारकडे जमा केले जात नाही.
त्यातील 50 टक्के रक्कम बांधकाम विभागाचे अधिकारी आपआपसांत वाटून घेत आहेत. हे सर्व कृत्य बेकायदा आहे. या प्रकरणाची चौकशी करावी व संबधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी माने यांनी पत्रकारपरिषदेत केली.
खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, यांच्यासह पूर्वीचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, बांधकाम विभागाचे सचिव एस.एस. साळुंके, सचिव उ. प्र. देबडवार या प्रमुख अधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी सहभागी असल्याचा आरोप माने यांनी केला.
मागील चार वर्षात अधिकाऱ्यांनी साडेबारा कोटी रुपये आपआपसात वाटून घेतल्याचे निदर्शनास आले आहे. हा सर्व प्रकार बेकायदा असल्याचा गंभीर आक्षेप ‘कॅग’ ने नोंदविला असल्याचे माने यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मंत्र्याची दिशाभूल करून हा प्रकार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या(शरदचंद्र पवार) वतीने माने यांनी केली आहे.
पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील नवीन बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठीच्या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता उजेडात आली आहे. या गैरव्यवहारामुळे सरकारच्या पारदर्शकतेच्या दाव्यांना काळिमा फासला गेल्याची टीकाही माने यांनी केली.
सामना मध्ये देखील या संदर्भात वृत्त प्रकाशित करण्यात आलं आहे. त्यावर पत्रकारांनी प्रश्न केला असता संजय राऊत म्हणाले, ती काही सामनाची बातमी नाही. ‘कॅग’ ने दिलेल्या रिपोटच्या आधारावर केलीली ती बातमी आहे.
एकनाथ शिंदे हे आमचे राजकीय शत्रू आहे म्हणून ती बातमी दिली असे नाही. तो CAG रिपोर्ट आहे. या CAG रिपोर्टवरुन युपीएचं सरकार पडलं होत. याच CAG रिपोर्टचा आधार घेऊन दिल्ली मध्ये केजरीवाल यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीने आघाडी उघडली आहे. त्यात प्रकारे हे सरकारच्या भ्रष्टाचाराचं ऑडीट आहे.
एकनाथ शिंदेयांनी हे खातं कशाप्रकारे लुटलं आहे हे यातून स्पष्ट होतं. मालक लूट करतोय हे बघून अधिकारीही लूट करत असल्याची टीका संजय राऊत यांनी यावेळी केली. या सगळ्यांच्या चौकश्या व्हायला पाहीजे असे संजय राऊत म्हणाले.