
पुणे प्रतिनिधी
पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने पैशांअभावी महिलेला उपचार देण्यास नकार दिला. हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर सरकारला जाग आली आहे. आरोग्य विभागाने दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाला नोटीस बजावली आहे.
24 तासांमध्ये अहवाल सादर करा, असे निर्देश आरोग्य विभागाने दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाला दिले आहेत.
एका मराठी वृत्तवाहिनीनुसार, आरोग्य उपसंचालक कार्यालयाने मंगेशकर रूग्णालयाला नोटीस बजावली आहे. त्यात लिहिले की, ‘महाराष्ट्र अधिसूचना दिनांक 14 जानेवारी 2021 मधील नियम 11 ( जे ) मधील अनुक्रमांक 1 ते 3 पालन करण्यास कसूर झालेले दिसून येत आहे. सदर बाब गंभीर स्वरूपाची आहे. दी बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कलम 1949 आणि महाराष्ट्र शासन अधिसूचना 14 जानेवारीमधील तरतुदींचे उल्लंघन करणारी आहे. सबब, आपणास या नोटीशीद्वारे कळवण्यात येते की, ही नोटीस प्राप्त होताच 24 तासांच्या आत वस्तुस्थितीदर्शक अहवाल संबंधित डॉक्टरांच्या खुलासा पत्रासह या कार्यालयास सादर करण्यात यावा.’
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
सदर घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. असंवेदशीलतेचा परिचय या घटनेतून पाहायला मिळतोय. खरेतर दीनानाथ मंगेशकर हे अतिशय प्रसिद्ध रूग्णालय आहे. लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबाने हे रूग्णालय उभे केले आहे. पण, रूग्णालयातील डॉक्टरांनी प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला भरती करून घेण्यास नकार दिला किंवा अधिकचे पैसे मागितले. याची लोकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे.”
“धर्मदाय रूग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे. यासाठी एक समिती नेमली आहे. ही समिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील घटनेचा तपास करेल. त्यासह अशा घटना घडू नये म्हणून धर्मदाय रूग्णालयांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. पैशांची काळजी न करता रूग्णाला रूग्णालयात भरती करण्याची गरज होती. त्यामुळे नियमांचे पालन होतेय की नाही, यासंदर्भात प्रयत्न करणार आहोत. स्वत:हा मुख्यमंत्री कक्षाने दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील घटनेबद्दल लक्ष घातले होते. मात्र, रूग्णालयाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. अशा घटना घडू नये म्हणून अतिशय कडक कारवाई करण्यात येईल असेही फडणवीसांनी म्हणाले.