
मुंबई प्रतिनिधी
भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा मृत्यू दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
तनिषा यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णालयाने पैसे जमा करण्याची अट घातल्याने त्यांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळाली नाही, असा दावा त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. या घटनेवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. आता या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे.
29 मार्च रोजी तनिषा यांना प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणले असता, रुग्णालय प्रशासनाने 10 लाख रुपये जमा करण्याची मागणी केली. कुटुंबीयांनी अडीच लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली, तरीही त्यांना दाखल करून घेतले गेले नाही, असे आरोप तनिषा यांच्या कुटुंबीयांनी केले आहेत.
यामुळे तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले, परंतु वाटेतच त्यांची प्रकृती बिघडली. त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला, परंतु काही मिनिटांतच तनिषा यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली असून, कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाने आयुक्त पुणे महानगरपालिका यांना सदर प्रकरणी तथ्य तपासत चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आणि आयोगास वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी हे आरोप फेटाळले आहेत. माध्यमांमध्ये अर्धवट माहिती पसरवली जात असून, यामुळे रुग्णालयाची बदनामी होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून सत्य समोर आणले जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळले आहेत. या घटनेने संतापाची लाट उसळली असून, रुग्णालय प्रशासनावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.