
मुंबई प्रतिनिधी
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असतानाच मुंबईत मराठी भाषेचा अवमान होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात मुंबईत अनेक ठिकाणी मराठी भाषेचा जाणून बुजून अपमान केला जात आहे.
मात्र सर्वांनाच इथली भाषा स्वीकारता येते असं नाही. परराज्यातील असल्यामुळे मराठी बोलता येत नसणारे आणि विशेष म्हणजे त्याची गरज वाटत नसणारे अनेकजण वारंवार मराठीचा अपमान करीत असल्याच्या घटना समोर येत असतात. असाच एक प्रकार मुंबईतील पवईत उघडला आहे.
पवईतील L&T च्या सुरक्षा रक्षकाची एका मराठी व्यक्तीसोबत काही कारणामुळे वाद झाला. यातून दोघांमध्ये बाचाबाची झाली. मात्र हा सुरक्षा रक्षक उत्तरेकडील असल्यामुळे त्याला मराठी बोलता येत नव्हतं. याशिवाय मराठी येत नसल्याचं छातीठोक पणे सांगणाऱ्या या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी चांगलीच अद्दल घडवली. मनसैनिकांनी त्याला चांगलीच समज दिली. आधी त्याला कानशिलात लगावली आणि मराठीचा अपमान केल्याबद्दल संताप व्यक्त केला. मनसैनिकांकडून नेहमीच मराठी भाषेचा अवमान करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला जातो. यंदाही पवईमधील L&T मध्ये ‘मराठी गया तेल लगाने’ म्हणणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या कानाखाली लगावण्यात आली.
मराठी येत नसेल तर शिकायला हवं आणि हे शांतपणे बोलायला हवं. ‘मराठी गया तेल लगाने’ असं म्हणत मराठी भाषेचा अपमान करणं योग्य नसल्याचं मनसैनिकांनी यावेळी सांगितलं. मराठी येत नसेल तर ती भाषा शिका. मात्र त्याचा अवमान करणाऱ्याला सोडणार नाही असंही मनसैनिक यावेळी म्हणाले.