
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबईतील घरांच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर मुंबईजवळील अंबरनाथ येथे केवळ २० लाख रुपयांत घर उपलब्ध होणार आहे.
शिवगंगा नगर येथे ९२५ सदनिका बांधण्यात येणार असून त्यापैकी १५१ सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. उर्वरित ७७४ सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत. कोहोज कुंठवली येथे १ हजार ६०६ सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध होणार आहेत. अत्यल्प उत्पन्न गटासाठी असणाऱ्या घरांच्या किमती २० ते २२ लाख आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या किमती ४५ ते ५० लाख रुपये असतील. या दोन्ही गृहनिर्माण प्रकल्पांचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. मार्च २०२८ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजित आहे. या प्रकल्पांमध्ये दुकानांसाठी गाळे, पार्किंग, मनोरंजन मैदान, सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, पर्जन्यजल संचयन केंद्र, सेंद्रिय कचरा प्रक्रिया केंद्र, सौरऊर्जा यंत्रणा, इत्यादी सोयीसुविधा पुरवल्या जातील.
सर्वेक्षणाला चांगला प्रतिसाद
कोकण मंडळाची बरीच घरे विक्रीविना पडून आहेत. त्याची पुनरावृत्ती अंबरनाथमध्ये होऊ नये यासाठी प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वी मागणी निर्धारण सर्वेक्षण करण्यात आले. यात शिवगंगा नगर येथील अत्यल्प उत्पन्न गटाच्या १५१ घरांसाठी ६८३ जणांनी, तर याच प्रकल्पातील मध्यम उत्पन्न गटाच्या ७७४ सदनिकांसाठी १ हजार ९४४ जणांनी स्वारस्य दाखवले. कोहोज कुंठवली येथील अत्यल्प उत्पन्न गटाच्या १ हजार ६०६ सदनिकांसाठी २ हजार ७४८ जणांनी स्वारस्य दाखवले. त्यामुळे घरांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष सोडतीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा म्हाडाला आहे.