
मुंबई प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाने धारावीतील एका बनावट दारू रॅकेटचा पर्दाफाश केला आहे, जिथे उच्च दर्जाच्या परदेशी ब्रँडच्या बाटल्यांमध्ये स्थानिक पातळीवर तयार केलेली दारू भरून ती स्कॉच म्हणून विकली जात होती. या कारवाईत ४.३२ लाख रुपये किमतीचे बनावट स्कॉच, रिकाम्या बाटल्या, बनावट लेबल्स आणि अस्सल पॅकेजिंगची नक्कल करणारे साहित्य जप्त करण्यात आले.
गुप्त माहितीवरून निरीक्षक रियाज खान आणि संतोष शिवपूरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धारावीच्या संत ककैया मार्गावरील शिवशक्ती नगर चाळ येथे छापा टाकला. या कारवाईत अनिकेत दिलीप काशिद (२३) हा तरुण स्कॉच व्हिस्की ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या स्थानिक दारूने भरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
झडतीत जॉनी वॉकर डबल ब्लॅक आणि रेड लेबल स्कॉचच्या चार सीलबंद बाटल्या (१००० मिली) जप्त करण्यात आल्या. तसेच, विविध परदेशी ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट लेबल्स आणि पॅकेजिंग साहित्य जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची किंमत ४.३२ लाख रुपये आहे.