
मुंबई प्रतिनिधी
राज्यात हुक्क्यावर बंदी आहे. मात्र, त्यानंतरही कोणी हॉटेलमध्ये अशा प्रकारे हुक्का पार्लर चालवत असल्यास संबंधितांचे हॉटेलचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पुणे शहरात अनेक ठिकाणी विशेषतः महाविद्यालय परिसरात हुक्का पार्लर हॉटेल मध्ये बेकायदेशीर चालवली जातात. त्या ठिकाणी हुक्काच्या नावाखाली ड्रग्स, गांजा तसेच अमली पदार्थ मुलांना दिले जातात त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. पुण्यात अनेक ठिकाणी ही प्रकार सुरू असून अशा हुक्का पार्लरला कोरेगाव पार्क तसेच परिसरात परवानगी दिली आहे का ? असा प्रश्न कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल कांबळे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.
कठोर अंमलबजावणी केली जाणार…
फडणवीस म्हणाले की, हुक्का पार्लरचे प्रस्थ रोखण्यासाठी २०१८ मध्ये कायदा करण्यात आला. आता त्याची कडक अंमलबजावणी केली जाईल. पहिल्यांदा कारवाईत हुक्का सापडल्यास ३ वर्षे शिक्षा आहे.मात्र आता कायद्यात सुधारणा केली जाणार असून दुसऱ्यांदा हुक्का सापडल्यास ६ महिने हॉटेल अथवा रेस्टॉरंट परवाना रद्द करणे आणि तिसऱ्यांदा हुक्का सापडल्यास कायमचा परवाना रद्द करुन अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं