
कल्याण प्रतिनिधी
कल्याणमध्ये काल एका महिलेने माजी नगरसेवकाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना आणखी एक मारहाणीची घटना घडली आहे. कल्याणमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा राडा झाला.
पोलील स्टेशनमध्येच शिंदे गटाचे पदाधिकारी भिडले. एकमेकांना केलेल्या मारहाणीत एका पदाधिकाऱ्याच्या डोक्याला दुखापत झाली. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या हाणामारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कल्याणमध्ये शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून अलबेल नसल्याचं दिसून येत आहे. शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर आता शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच भिडल्याचं पाहायला मिळालं. पाणी प्रश्नावरून झालेला हा वाद थेट कोळशेवाडी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला.
पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच शिंदे गटाचे पदाधिकारी दिलीप दाखिणकर आणि मल्लेश शेट्टी एकमेकांमध्ये भिडले. दिलीप दाखिणकर यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. मल्लेश शेट्टी यांनी ही मारहाण केल्याचा आरोप दाखिणकर यांनी केला. तर मल्लेश शेट्टी यांनी दिलीप दाखिणकर यांनी माजी नगरसेविकेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.
पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली आहे. दाखिनकर यांना मेडिकलसाठी पाठवण्यात आले. या प्रकरणी पोलीस पुढील प्रक्रिया करत आहेत. शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला काल एका महिलेने भर रस्त्यात मारहाण केली.
माजी नगरसेवकाला मारहाण
दरम्यान, कल्याणमध्ये काल रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून एक महिला आणि माजी नगरसेवकामध्ये वाद झाला होता. राणी कपोते असे मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव आहे. राणी कपोते शिंदेंच्या पक्षाशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर मोहन उगले असे मारहाण झालेल्या शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचं नाव आहे. कल्याणमधील माजी नगरसेवकाच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.