
नागपूर प्रतिनिधी
नागपूर: मॅट्रीमोनिअल साईटवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणाने युवतीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने कोल्ड्रींकमध्ये औषध मिसळून तिला बेशुद्ध करून अत्याचार केला. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
नेहाल रविंद्र पाटील (३०, रा. सिद्धार्थनगर, वारीसपुरा, कामठी) असे आरोपीचे नाव आहे. १ जानेवारी २०२३ रोजी त्याची २७ वर्षीय तरुणीशी ‘शादी डॉटकॉम’ या ॲपवर ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये नियमित फोनवर संपर्क राहिला. नेहालने तिच्या घरी जाऊन लग्नाची मागणी केली.
त्यानंतर विश्वास संपादन करून त्याने तरुणीला कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ओयो हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांनी मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजवर नेऊन त्याने तिला कोल्ड्रींक पाजले आणि पुन्हा अत्याचार केला.
आरोपीने या दरम्यान युवतीचे छायाचित्रे आणि व्हिडिओ तयार केले. त्यानंतर हे व्हायरल करण्याची धमकी देत तिला लग्नाला नकार दिला. विरोध केल्याने त्याने तिच्यावर बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नेहाल पाटीलविरोधात गुन्हा दाखल केला आहे.