
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.शेषराव वानखेडेंचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाच्या जवळ पोहोचले. यापूर्वी शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा, जयंत पाटील यांनी 10 वेळा आणि सुशीलकुमार शिंदे 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.
राज्याच्या महसुली स्थितीबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की, “राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या एक टक्क्यापेक्षा कमी राहिली आहे. 2025-26 ची राजकोषीय तूट 1 लाख 36 हजार 235 कोटी रुपये आहे.
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
महाराष्ट्रात देशी-परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात, औद्योगिक विकासात राज्य अव्वल
जानेवारी 2025 मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्र सरकारने एकूण 63 कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले
भारताच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचं 15.4 टक्के वाटा
येत्या काळात महाराष्ट्रात 15 लाख 72 हजार 654 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर येथे ‘अर्बन हाट केंद्रां’ची स्थापना करण्यात येणार
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत 10 हजार महिलांना कौशल्य व कृत्रिम बुध्दिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, इनोव्हेशन सिटी, उभारण्यात येणार आहे.
हवामान बदल आणि समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये 8 हजार 400 कोटी रुपये किंमतीचा बाह्यसहाय्यित प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
‘राज्याचे “लॉजिस्टिक धोरण-2024’ जाहीर : 10 हजार एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधांचा विकास करणार, यातून 5 लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे
ज्या तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही, तेथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी “एक तालुका – एक बाजार समिती” योजना राबविण्यात येणार आहे.
2025-26 साठी विभागनिहाय आर्थिक तरतुदी
1) बंदरे विभागास 484 कोटी रुपये
2) सार्वजनिक बांधकाम-रस्ते विभागास 19 हजार 936 कोटी रुपये
3) परिवहन विभागास 3 हजार 610 कोटी रुपये
4) नगर विकास विभागास 10 हजार 629 कोटी रुपये
5) ग्रामविकास विभागास 11 हजार 480 कोटी रुपये
6) पर्यावरण व वातावरणीय बदल विभागास 245 कोटी रुपये
7) ऊर्जा विभागास 21 हजार 534 कोटी रुपये
8) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास 25 हजार 581 कोटी रुपये
9) आदिवासी विकास विभागास 21 हजार 495 कोटी रुपये
10) इतर मागास व बहुजन कल्याण विकास विभागास 4 हजार 368 कोटी रुपये
11) दिव्यांग कल्याण विभागास 1 हजार 526 कोटी रुपये
12) अल्पसंख्याक विकास विभागास 812 कोटी रुपये
1) लाडक्या बहिणीं’ना आतापर्यंत दिले 33 हजार कोटी
अजित पवार यांनी अर्थसंकल्प साद करताना माहिती दिली की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै, 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे.”
2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे, असंही पवारांनी सांगितलं.
तसंच, “या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.
२). छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर
अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून सांगितलं की, “छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदानस्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढु बुद्रुक येथे त्यांच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे.
दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत’ पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णयही शासनाने नुकताच घेतला आहे.”
तसंच, छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, तेथे भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल, असं अजित पवारांनी सांगितलं.
इतर स्मारकांबाबत अर्थसंकल्पातून दिलेली माहिती
भारताचे दिवंगत पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी राज्य शासनाकडून 220 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगांव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे त्यांच्या कार्यास साजेसे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.
चैत्यभूमी दादर, मुंबई येथे इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम सुरु असून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे. हरियाणा शासनाच्या मदतीने या स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगांव, तालुकाय वाळवा, जिल्हा सांगली येथील स्मारकासाठी तसेच त्यांच्या नांवे प्रस्तावित चिरागनगर, मुंबई येथील संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.