
जळगाव प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रकरणात एकूण सात जणांविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चार जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. तर इतर तीन आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले की, 28 फेब्रुवारीला घडलेल्या कोथळे गावातील घटनेबाबत काल दि. 2 मार्च रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अनिकेत भोई, किरण माळी, अनुज पाटील अशी त्यांची नावे आहेत.
एक आरोपी अल्पवयीन
तर आणखीन एक चौथा आरोपी अल्पवयीन आहे. त्याला देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे. एसआयआरमध्ये एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उर्वरित तीन आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. या प्रकरणात अनिकेत भोई हा मुख्य आरोपी आहे. त्याच्या विरोधात याआधी चार गुन्हे दाखल आहेत. चारही गुन्ह्याचे स्वरूप मारहाण, हाणामारी असे आहे. तर इतर आरोपींविरोधात याआधी कुठले गुन्हे दाखल असल्याची माहिती आतापर्यंत आम्हाला मिळालेली नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त कोथळी विविध कार्यक्रम पार पडतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला. त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु टवाळखोरांनी सुरक्षारक्षकाशी झटापट केली. टवाळखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे आक्रमक झाल्या होत्या. यानंतर या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सात पैकी चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अनुज पाटील, अनिकेत भोई, किरण माळी, अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टवाळखोरांची नावे आहेत.