
मुंबई -जोगेश्वरी परिसरातील दीपक जाधव वय-२८वर्ष या तरुणाचा जोगेश्वरी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दयायला गेले असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविण्या साठी गेलेल्या माझ्या भावाचा मृत्यू पोलिसांनी मारहाण केल्या मुळेच झाला.असा आरोप मृत्यू पावलेल्या दिपकच्या बहिणीने केला आहे.या घटने वरून पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दीपक जाधव हा केटरिंग व्यवसायात काम करत होता, आणि त्याने काही मुला-मुलींना कामावर ठेवले होते. मात्र, वेळेवर पगार न मिळाल्याने दीपक आणि त्याच्या कामगारांमध्ये वाद झाला होता. याच प्रकरणावरून दीपक जोगेश्वरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता. परंतु त्याच रात्री, पोलिसांच्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा त्याच्या बहिणीचा दावा आहे.
घटनेनंतर पोलिसांनी रात्री उशिरा नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत दीपकच्या मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कुपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दीपकच्या कुटुंबीयांचा असा आरोप आहे की पोलिसांनी तपास आणि पंचनाम्यात योग्य पारदर्शकता दाखवली नाही.
दीपकच्या बहिणीने स्पष्टपणे सांगितले आहे की पोलिसांच्या मारहाणीमुळेच तिच्या भावाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने कुटुंबात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, जोगेश्वरी पोलीस स्टेशनने या आरोपांचे खंडन केले असून, तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी हा एक अपघात असल्याचे म्हटले आहे आणि तपासानंतरच खरे कारण स्पष्ट होईल, असे आश्वासन दिले आहे. तर दीपकच्या कुटुंबीयांनी पोलीस विभागाच्या या खुलाशावर नाराजी व्यक्त केली आहे.