
मुंबई प्रतिनिधी
कोस्टल रोडवर सुसाट वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांवर राज्य प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमे दरम्यान ६०० वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून वाहनांना ई -चलान जारी करण्यात आले आहे.
ही मोहीम महिनाभर सुरू राहणार असून कारवाईची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. (RTO)
मरीन ड्राईव्ह (Marine Drive- Worli Costal Road) येथून वरळीला जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या कोस्टल रोड १२ मार्च २०२४ रोजी सुरू करण्यात आला आहे,कोस्टल रोड ला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले असले तरी स्पीड कॅमेरे अद्याप बसविण्यात आलेले नाही, त्यामुळे कोस्टल रोड वरून जाताना वाहन चालकाकडून बेफान होऊन भरधाव वेगाने वाहने चालविले जात असल्यामुळे अपघाताची संख्या वाढत आहे. स्पीड वर नियंत्रण ठेवण्यासाठी कोस्टल रोड ला स्पीड नियंत्रण कॅमेरे लावण्यात आलेले नसल्यामुळे वाहन चालकाकडून भरधाव वेगात वाहने चालवली जात असल्यामुळे बेदरकारपणे गाडी चालवणे, रेसिंग करणे आणि इतर उल्लंघनांवर लक्ष ठेवण्यासाठी कोस्टल रोडवरील प्रमुख प्रवेश आणि निर्गमन बिंदूंवर चार फ्लाइंग स्क्वॉड तैनात करण्यात आले आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला कोस्टल रोडवरील बोगद्याच्या भिंतीवर एक कार आदळल्यानंतर दोन चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले होते आणि वाहने जप्त करण्यात आली होती. या घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली होती आणि बेकायदेशीर रेसिंग आणि हॉर्न आणि मोठ्या आवाजातील एक्झॉस्ट पाईप्समुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती.गेल्या आठवड्यात राज्य परिवहन विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही कारवाई सुरू झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. “मरीन ड्राइव्ह ते वरळी दरम्यानच्या १० किमी लांबीच्या कोस्टल रोडवर ताडदेव आणि वडाळा आरटीओचे फ्लाइंग स्क्वॉड तैनात आहेत. आतापर्यंत, त्यांनी कोस्टल रोडवर परवानगी असलेल्या वेगमर्यादा ओलांडल्या बद्दल ५९६ वाहनांना ई-चलान जारी केले आहेत,” असे राज्य परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.ताडदेव आरटीओने ३०६ ई-चलान जारी केले, तर पूर्व उपनगरांची जबाबदारी असलेल्या वडाळा आरटीओने उर्वरित २९० ई-चलान जारी केले.
एका आरटीओ अधिकाऱ्याने सांगितले की, अतीवेगाने वाहन चालवणारे बहुतेक मर्सिडीज, ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या वाहनाचे मालकांना ई चलन देण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार, वेगाने गाडी चालवणे हा एक गुन्हा आहे ज्यामध्ये दंड आकारला जाऊ शकतो. दंडाची रक्कमऑनलाइन देखील भरता येतो.मरीन ड्राइव्ह ते वरळी पर्यंत पसरलेला १० किमीचा हा किनारी रस्ता १२ मार्च २०२४ पासून टप्प्याटप्प्याने खुला करण्यात आला आहे. ५० लाखांहून अधिक वाहनांनी आधीच त्याचा वापर केला आहे.