
मुंबई प्रतिनिधी
एखादा गडकिल्ला सर करण्यासाठी गेला आणि दोन वेण्या असलेली एक छोटी गोड मुलगी काटेरी झुडुपं, झाडी यांना कापत पुढे जात असेल तर तिचं वेगळेच रूप आहे.
कारण सात वर्षांच्या या चिमुकलीने आतापर्यंत 121 किल्ले सर केले आहेत. इतकंच नाही, तर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करत ती आणखी किल्ले सर करण्याच्या तयारीत आहे.
शिवाजी महाराजांचे नाव ऐकून एक वेगळीच ऊर्जा मिळत असल्याचं ती सांगते. आज (19 फेब्रुवारी) शिवजयंती निमित्त तिची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सध्या जगभरात ट्रेकिंगची क्रेझ वाढली आहे. महाराष्ट्रातही अनेक ट्रेकर्स (गिर्यारोहक) आपल्याला पाहायला मिळतात. पण, या 7 वर्षांच्या चिमुरडीसारखे ट्रेकर्स तर अभावानेच पाहायला मिळतात.
तिने सह्याद्रीच्या कुशीतल्या 121 किल्ल्यांवर झेंडा रोवला आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे जरी ती एकाच किल्ल्यावर परत गेली तरी तो किल्ला ती एकदाच मोजते.
शर्विका जितेन म्हात्रे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर सर करणारी सर्वांत लहान गिर्यारोहक आहे. अनेक रेकॉर्डस तिनं आपल्या नावावर केले आहेत.
एवढंच नाही तर तिची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड’मध्येही नोंद झाली आहे.
शर्विकानं वयाच्या अवघ्या अडीचव्या वर्षी पहिला किल्ला सर केला. महाराष्ट्रातील सर्वात कठीण किल्ल्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पनवेल-कर्जतजवळील कलावंतीण सुळका किल्ला सर करणारी ती महाराष्ट्रातील पहिली मुलगी ठरली आहे.
या व्यतिरिक्त वयाच्या तिसऱ्या वर्षी तिनं सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच असा नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ला सर केला.
वयाची साडेतीन वर्षं देखील पूर्ण होत नाहीत, त्याआधी शर्विकाने महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाईदेखील सर केलं. गुजरातमधील सर्वात उंच गिरनार शिखर तिनं वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी सर केलं.
वयाच्या सातव्या वर्षापर्यंत तिने राजगड, रायगड, तोरणा, सिंहगड, साल्हेर, श्रीमलंग गड, भैरवगड, लिंगाणा, तैल बैला, पारगड, माहुली, हरिहर, धर्मवीर गड, भुदरगड, हरिश्चंद्रगड, वैराट गड, कमळगड, पांडवगड, केंजळगड, रोहिडा, पुरंदर, कैलासगड असे महाराष्ट्रातील सर्वात कठीण आणि सर्वाधिक गिरिदुर्ग असे तब्बल 121 किल्ले यशस्वीपणे सर केले आहेत.