
मुंबई प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रभाव क्षेत्र असलेल्या ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा आक्रमक राजकारणाला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर संदीप नाईक यांच्यासोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात गेलेल्या नवी मुंबईतील २७ माजी नगरसेवकांना पक्षात पुन्हा प्रवेश देताना भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आक्रमक राजकारणाचा पाया रचण्यास सुरुवात केली आहे.
शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जिल्ह्यात दोन हात करण्याची तयारी यानिमीत्ताने सुरु झाल्याची चर्चा भाजपच्या अंतर्गत गोटात यानिमीत्ताने सुरु झाली असून वनमंत्री गणेश नाईक आणि किसन कथोरे हे नेते या आक्रमक राजकारणाचा चेहरा ठरतील अशापद्धतीची आखणी केली जात आहे.
एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपने गणेश नाईक यांना मंत्रीमंडळात संधी देताच शिंदे यांच्या गोटात सावध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. गणेश नाईक यांनी ठाणे आणि पालघर या एकत्रीत जिल्ह्याचे दहा वर्षांहून अधिक काळ पालकमंत्री पद भूषविले आहे. त्यामुळे त्यांना या संपूर्ण पट्टयाची खडानखडा माहीती आहे. आगरी समाजाची पार्श्वभूमी असलेल्या नाईक यांना ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यात मानणारा एक मोठा वर्ग आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद असताना नवी मुंबईत ठाण्यावरुन होणाऱ्या वाढत्या हस्तक्षेपाविषयी नाईक यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून नाईक यांची येथे सत्ता राहीली आहे. प्रशासकीय राजवटीत या महापालिकेवर ठाण्याच्या वाढत्या प्रभावामुळे नाईक नाराज असल्याचे पहायला मिळाले.
‘नवी मुंबईचे कारभारी ठरविणारे तुम्ही कोण’ या शब्दात नाईक यांनी नगरविकास विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे नाईकांना मंत्रीमंडळात स्थान देताच शिंदेसेनेचे नेते सावध झाल्याचे चित्र होते. एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात नाईक यांनी ‘ठाण्यात फक्त कमळ’ अशी घोषणा करत शिंदेसेनेची अस्वस्थता आणखी वाढवली. याच कार्यक्रमात ठाण्यात जनता दरबार घेणार अशी घोषणाही नाईक यांनी केली. या घडामोडी सुरु असताना नाईक यांच्या ऐरोली या विधानसभा मतदारसंघात पक्ष प्रवेशाच्या एका जाहीर मेळाव्यात शिंदे यांनीही आपण ‘दरबारी’ राजकारण करत नाही असा टोला नाईक यांना लगाविला होता. या दोन नेत्यांमधील हा छुपा संघर्ष चर्चेत असताना मंगळवारी सायंकाळी शरद पवार यांच्या पक्षात गेलेल्या २७ माजी नगरसेवकांना नाईक यांच्या आग्रहास्तव पक्षात पुन्हा प्रवेश देऊन भाजपने आगामी महापालिका निवडणुकांसाठी पक्ष सज्ज असल्याचा संदेश दिल्याची चर्चा आता रंगली आहे.