
मुंबई प्रतिनिधी
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाकांक्षी 701 किमी लांबीचा सहा-लेन प्रवेश-नियंत्रित द्रुतगती मार्ग आहे. हा महामार्ग मुंबई आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडतो, ज्यामुळे या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सुमारे 16 तासांवरून 8 तासांपर्यंत कमी होईल.
आता मुंबई ते नागपूर या समृद्धी एक्सप्रेसवेचा शेवटचा इगतपुरी ते आमणे दरम्यानचा 76 किमीचा मार्ग या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे भिवंडीहून लवकरच मोटारचालकांना मुंबई-नागपूर समृद्धी एक्सप्रेसवेवरून प्रवास करणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या एक्सप्रेसवेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, सध्या अंतिम लेन मार्किंग आणि रंगरंगोटीचे काम सुरू आहे.
हे काम 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सर्व प्रमुख बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच ही कामे केली जातात, ज्यामुळे महामार्ग सार्वजनिक वापरासाठी जवळजवळ तयार असल्याचे दिसून येते. उद्घाटन कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल, असे हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे. सध्या, नाशिकजवळील इगतपुरी ते नागपूर हा 625 किमी लांबीचा एक्सप्रेस वे कार्यरत आहे.
नव्या सरकार स्थापनेत आणि खात्यांच्या वाटपात झालेल्या विलंबामुळे नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मध्ये हा 76 किमी लांबीचा इगतपुरी-अमाणे मार्ग खुला करण्याची योजना पुढे ढकलण्यात आली. त्याऐवजी, एमएसआरडीसीने सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा आणि संपूर्ण मार्ग एकाच वेळी सुरू करण्याचा निर्णय घेतला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा 701 किमी लांबीचा एक्सप्रेसवे, डिसेंबर 2022 पासून टप्प्याटप्प्याने खुला करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या 520 किमी लांबीच्या मार्गाचे उद्घाटन केले.