
मुंबई प्रतिनिधी
ठाकरे गटाला गळती लागली असून
सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सुरु आहे. ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे गटात प्रवेश करत आहेत.
दोनच दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांची आभार सभा झाली. त्यावेळी कोकणातील ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. आता कोकणात ठाकरे गटाकडे भास्कर जाधव यांच्या रुपाने फक्त एकमेव आमदार उरला आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी मागच्या शुक्रवारी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. चिपळूणचे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी क्षमतेनुसार आपल्याला संधी मिळाली नाही, अशी खंत व्यक्त केली. त्यानंतर ते सुद्धा ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. भास्कर जाधव यांची खंत दूर करण्यासाठी ठाकरे गटातील नेत्यांनी त्यांच्यासोबत एक बैठक करुन मन वळवण्याचा प्रयत्न केला.
फक्त कोकणच नाही, राज्यभरातील ठाकरे गटाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहे. विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर हे प्रमाण वाढलं आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 57 जागांवर विजय मिळवला, तेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या गटाला फक्त 20 जागा मिळाल्या. एकप्रकारे या निकालाने खरी शिवसेना कोणाकडे आहे? या प्रश्नाच उत्तरही मिळालं. त्यामुळे ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचं प्रमाण वाढलं. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गळती रोखण्यासाठी ठाकरे गट सुद्धा सक्रीय झाला आहे.
दिल्लीत झालेली बैठक
ठाकरे गटाच्या खासदारांची येत्या 20 फेब्रुवारीला तर आमदारांची 25 तारखेला बैठक होणार आहे. खासदार-आमदारांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. पक्षातील अनेक पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत असताना उद्धव ठाकरे यांनी बोलवली आमदार खासदारांची बैठक. दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना आदित्य ठाकरे यांनी खासदारांची दिल्लीत बैठक घेतली होती.
बैठक का होतेय?
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना काही खासदार ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा सुरु होती. त्या सोबत ऑपेरेशन टायगर अशा चर्चा सुरु असताना ठाकरे खासदारांची बैठक घेणार आहेत. विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बैठक होणार आहे. आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर यां बैठकीत विरोधी पक्ष नेत्याचे नाव निश्चितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 20 तारखेला खासदार आणि 25 तारखेला आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे शिवसेना भवन येथून आदेश देण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.