
मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांची लवकरच लोकल ट्रेनच्या गर्दीतून सुटका होणार आहे. मार्च अखेरीस मुंबईकरांसाठी मेट्रोचा आणखी एक टप्पा सुरू होऊ शकतो. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांनी कुलाबा-वांद्रे सीप्झ भूमिगत मेट्रो ३ प्रकल्पाच्या बीकेसी-कुलाबा टप्प्याबाबत माहिती दिली आहे.
या टप्प्याचं आतापर्यंत ९३. ९ टक्के काम पूर्ण झालंय. मार्च अखेरपर्यंत प्रवाशांसाठी हा मार्ग खुला होऊ शकतो. या मेट्रो प्रकल्पाचा आढावा महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता.
लवकरच प्रवाशांच्या सेवेत रूजू
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रोच्या महत्त्वाच्या टप्प्यातील बीकेसी-आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकांचे बांधकाम वेगाने सुरू आहे. त्यामुळे मेट्रो सेवा लवकरच प्रवाशांच्या सेवेत रूजू होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांना गर्दीपासून सुटका मिळणार आहे.
एमएमआरसी अधिकाऱ्यांनी सांगितले की, फेज २ ए च्या बांधकामासोबत त्याचं स्ट्रक्चर आणि सिस्टमॅटीक फंक्शनचं काम शेवटच्या टप्प्यात आहे. सुरक्षा प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. यानंतर या टप्प्याला वाहतूक सेवेत आणण्यासाठी आवश्यक असलेली अंतिम मान्यता घेतली जाईल. या टप्प्याचे कामकाज अंतिम टप्प्यात सुरू आहे.
मुंबई मेट्रोची एकूण लांबी ३३.५ किलोमीटर आहे. या मार्गावर एकूण २७ स्थानकं आहेत. हे कॅफे परेड बीकेसी आणि आरे जेवीएलआरला जोडतं. हा मार्ग बीकेसी ते आचार्य अत्रे चौक असा आहे. आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो पोहोचल्यामुळे बीकेसी ते वरळी दरम्यान मेट्रो कनेक्टिव्हिटी निर्माण होईल.