
मुंबई प्रतिनिधी
पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना ताज्या असतानाच
वांद्रे येथे नाकाबंदी करणाऱ्या एका पोलिस शिपायाला भररस्त्यात शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी सैफ रईस खान या २४ वर्षांच्या तरुणा विरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस शिपायाला शिवीगाळ करून मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
माहीम पोलिस वसाहतीत राहणारे अमोल नावाडकर हे वांद्रे पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी सायंकाळी ते वांद्रेत नाकाबंदी करत होते. या वेळी माहीम कॉजवे येथून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला थांबवून त्यांनी त्याच्याकडे लायसन्सची मागणी केली होती. त्याचा राग आल्याने दुचाकीच्या मागे बसलेल्या सैफने त्यांना शिवीगाळ करून जोरात कानशिलात लगावली. त्यांचा शर्ट पकडून जोरात खेचून फाडला. त्याला समजावून सांगूनही तो आक्रमक झाला होता. तो त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होता. ही माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या वेळी पोलिसांनी अमोल नावाडकर यांना शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या
तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात त्याला नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले. सैफ हा वांद्रेत राहात असून, भंगारविक्रेता म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.