
मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून येणारा हप्ता नियमीतपणे लाडक्या बहिणींच्या खात्यात जाणे, ही मोठी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर आहे.
परंतु, गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेसंदर्भात समोर येत असलेल्या विविध बातम्यांमुळे मोठा संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. त्यातच पाच लाख अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. पण आता या योजनेबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.
जालना जिल्ह्यातील परतूरधील काँग्रेसचे माजी आमदार सुरेश जेथलीया यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश झाला. त्यावेळी ते या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्ता कधी जमा होणार? याची माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लाडकी बहिण योजनवरुन आमच्यावर टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असे सांगतिले जात आहे. पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. कालच मी 3 हजार 500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात आठवा हप्ता जमा होणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाच लाख अपात्र महिलांची नावे योजनेतून वगळल्याची माहिती देण्यात आली होती. या पाच लाख महिलांना विविध कारणांमुळे अपात्र घोषित करण्यात आले असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या डिसेंबर 2024 मध्ये 2.46 कोटी होती, ती आता 2.41 कोटींवर आली आहे. या पाच लाख महिलांमधील 1.5 लाख महिला या 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत. 1.6 लाख महिलांकडे चारचाकी वाहन आहेत किंवा त्या नमो शेतकरी योजना किंवा अन्य काही सरकारी योजनांचा सुद्धा लाभार्थी आहेत. 2.3 लाख महिला या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आधीच अनुदान घेत होत्या. सरकारने पात्र महिलांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर ही माहिती समोर आली आणि पहिल्याच फेरीत 5 लाख लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले.