
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्येच पुढची पाच वर्षे गुगलचं ऑफिस सुरु राहणार आहे. राज्यातील नव्या सरकारने पुन्हा एकदा बीकेसीकडे लक्ष केंद्रित केलं आहे.
त्यामुळे गुगल इंडियाने पुढच्या पाच वर्षांसाठी मुंबईच्या बीकेसीमधील ऑफिसच्या लीजचं रिन्यूअल केलं आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीकेसीमध्येच स्टार्टअप समिटचं आयोजन केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्टअप इंडिया मोहिमेला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ही समिट आयोजित करण्यात आली होती. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. फडणवीस यांनी त्यावेळी इनोव्हेशन सिटी तयार करण्याची घोषणा केली होती. बीकेसी आणि वरळी मेट्रो कॉरिडोर लवकरच सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गुगलने हा निर्णय घेतला आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या 100 दिवसांच्या अजेंड्यामध्ये ही घोषणा केली आहे.
गुगल इंडियाने बीकेसीमध्ये 304 कोटी रुपये इतकं पाच वर्षांचं भाडं ठरवत भाडे कराराचं रिन्यूअल केलं आहे. स्क्वेयरयार्ड्सने गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि गुगल क्लाउड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या ऑफिसच्या जागेच्या लीजच्या रिन्यूअलविषयीची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, बीकेसीमध्ये साधारण 1.11 लाख स्क्वेअर फूट एवढ्या जागेसाठी 3.55 कोटी रुपये प्रतिमहिना इतकं भाडं ठरवत चं रिन्यूअल केलं आहे. गुगल क्लाउड इंडियाने बीकेसीमधल्या ऑफिससाठी 1.24 कोटी रुपये इतकं दर महिना भाडं द्यायचं मान्य करत कराराचं नूतनीकरण केलं आहे. गुगलच्या दोन्ही कंपन्यांनी 320 रुपये प्रति स्क्वेअर फूट मासिक भाड्याच्या दराने जागा लीजवर घेतली आहे. गुगलची ही दोन्ही कार्यालये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये फर्स्ट इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर (FIFC) मध्ये आहेत. गुगलची भारतातील अनेक शहरांमध्ये कार्यालये आहेत. त्यामध्ये गुरुग्राम, हैदराबादचाही समावेश आहे.
बीकेसीचा परिसर 370 हेक्टरच्या आसपास आहे. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) ने या भागाचा विकास केला आहे. बीकेसीच्या विकासाच्या दृष्टीकोनातून मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडोरचा एकमेव अंडरग्राउंड टर्मिनसही इथे तयार करण्यात येणार आहे. हे बीकेसी या शहरातील केंद्रीय व्यापार जिल्हा (CBD) आहे. तसेच हे BFSI क्षेत्र आणि फॉर्च्यून 500 कंपन्यांचे प्रमुख केंद्र आहे. इथे जिओ, Apple, नेटफ्लिक्स, फेसबुक, Amazon,राष्ट्रीय स्टॉक एक्स्चेंज, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, वीवर्क, सिस्को, फायझर, स्पॉटिफाय आणि ब्लॅकस्टोन यांचंदेखील ऑफिस आहे.
बीकेसीमध्ये जीएसटी, भारतीय रिझर्व्ह बँक, आयकर विभाग आणि कुटुंब न्यायालयही आहे. अमेरिकन एम्बसीचं बीकेसीमध्ये मोठं ऑफिस आहे. बीकेसीमध्ये काही मॉल आहेत.