
सातारा प्रतिनिधी News नेटवर्क.
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात सध्या सगळेच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. प्रत्येक पक्ष आपले उमेदवार जाहीर करताना दिसत आहेत. वांद्रे पश्चिम मतदार संघात सध्या भाजपचे आशिष शेलार आमदार आहेत.
या ठिकाणी काँग्रेसकडून प्रिया दत्त यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे समजत आहे. त्यामुळे वांद्रे पश्चिममध्ये हाय होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे.
सन 2019 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रिया दत्त यांचा पराभव झाल्यानंतर पुढील पाच वर्षे त्या पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमात दिसल्या नव्हत्या. यंदाच्या लोकसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू असताना त्यांना तिकीट नाकारण्यात आलं होते. त्यांच्या जागी वर्षा गायकवाड यांना तिकीट देण्यात आले होते. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव करत वर्षा गायकवाड विजयी झाल्या होत्या.
त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीत प्रिया दत्त यांना उतरवण्यात येणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रिया दत्त अशी निवडणूक आता वांद्र पश्चिममध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.