
मुंबई प्रतिनिधी
उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. मध्य रेल्वेला लवकरच एक एसी लोकल ट्रेन मिळणार आहे. विशेष म्हणजे ही ट्रेन सध्याच्या लोकल ट्रेनपेक्षा वेगळी असणार आहे. या ट्रेनमधील काही यंत्रसामग्री ही बोगीच्या खाली म्हणजेच अंडरस्लग असणार आहे. विशेष ऐसे लोकल लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
सध्या अशा ट्रेन पश्चिम रेल्वेवर धावत आहेत. येत्या काही दिवसामध्ये ही नवी ट्रेन मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार असून त्यामुळे मध्य रेल्वेकडे एकूण 7 एसी ट्रेन होणार आहेत.
एसी लोकलची वैशिष्ट्ये
1. दोन्ही टोकांवर महिलांसाठी डबे
2. प्रथम श्रेणीचा डबा नाही
3. इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक दरवाजे
4. प्रवासी टॉक-बॅक सिस्टम
5. वाढीव सुरक्षेसाठी सीसीटीव्ही देखरेख
पावसाळ्यात येऊ शकणारी आव्हाने
नव्या एसी लोकलच्या चालू असलेल्या चाचणी टप्प्याचा एक भाग म्हणून, मध्य रेल्वे अधिकारी या नवीन ट्रेनसाठी विशिष्ट संभाव्य ऑपरेशनल आव्हानांचे मूल्यांकन करत आहेत. पावसाळ्यात या एसी ट्रेनचे नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण ट्रॅकवर पाणी साचल्यास खाली असलेल्या मोटर प्लेसमेंटमध्ये अडचणी येऊ शकतात. मोटारी खाली ठेवल्या असल्याने, मुसळधार पावसात ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वेच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. त्यातच मध्य रेल्वेचे ट्रॅक पश्चिम रेल्वेपेक्षा थोडे खाली आहेत. या ठिकाणी पावसाळ्यात पाणी लवकर साचते. त्यामुळे आतापर्यंत मध्य रेल्वेने अशा लोकल चालवणं टाळलं होतं.
दरम्यान, अंडरस्लग ट्रेनमध्ये नियमित गाड्यांपेक्षा जास्त जागा असते. त्यामुळे प्रवाशांची बसण्याची क्षमता देखील अधिक होते. याचा फायदा प्रवाशांना होत असल्याने सध्या अंडरस्लग गाड्यांना प्राधान्य दिलं जात आहे. नवीन ट्रेनची चाचणी झाल्यानंतर मध्य रेल्वेवर एसी लोकलची संख्या वाढणार आहे. यासाठी जवळपास 6 महिन्यांचा काळ लागू शकतो. सध्या मध्य रेल्वेवर 66 एसी लोकल सेवा धावतात. पुढील काळात यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. सध्या मध्य रेल्वेकडे एकूण 6 रेक आहेत. यातील दोन रेक दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे 4 रेकच्या माध्यमातूनच या 66 लोकल सेवा सुरू आहेत. आता नवीन रेक मिळाल्यानंतर एक रेक कायम राखीव ठेवण्याचं नियोजन आहे.