मुंबई प्रतिनिधी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे गूढ अद्याप कायम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी (१६ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘मफलरवाला नेता’ कोण, याचा अखेर त्यांनी फोटोसह खुलासा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवत रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न कोण करत आहे, असा थेट सवाल उपस्थित केला. मात्र, फडणवीस यांचा अजित पवार यांच्या विमान अपघाताशी थेट संबंध असल्याचा आरोप आपण करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार यांनी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत तीन व्हिडिओ आणि विविध कागदपत्रांच्या आधारे अनेक गंभीर दावे केले. अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपात होता का, या संशयाला बळ देणारे अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केले. विशेष म्हणजे, अपघाताशी संबंधित व्हीएसआर कंपनीच्या मालकांना कोणाचा राजकीय आशीर्वाद आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले.
‘फडणवीस यांचा अपघाताशी संबंध नाही; पण व्हीएसआरला कोण वाचवतंय?’
रोहित पवार म्हणाले, अजितदादा गेल्यानंतर त्यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. व्हीएसआर कंपनीला राज्य सरकारकडून १६८ कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. दादांची विमाने चांगली मिळावीत यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याची इच्छा होती. मात्र, केंद्रातील विमान वाहतूक मंत्रालयाच्या पातळीवर ही प्रक्रिया बदलून व्हीएसआर कंपनीला काम देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘दादांच्या विमान अपघाताचे खापर कदाचित पायलटवर फोडले जाईल. मात्र, या प्रकरणामागचे सत्य बाहेर आले पाहिजे. स्वतःच्या काकाला न्याय देऊ शकत नसेल, तर सर्वसामान्यांना कसा न्याय देणार? यासाठी मला राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
आपल्या कुटुंबीयांनाही या भूमिकेमुळे चिंता वाटत असल्याचे सांगत रोहित पवार म्हणाले, ‘दादांना सोडले नाही, तर तुला कसे सोडतील, अशी भीती घरच्यांना वाटते. मात्र, मी राजकारणात पदासाठी आलेलो नाही.’
व्हीएसआरच्या मालकांसोबतच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह
रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यावसायिक व्यवहारांबाबतही गंभीर आरोप केले. कंपनीच्या देशाबाहेरील मालमत्ता, विविध कंपन्यांमधील भागीदारी आणि आर्थिक व्यवहारांचा उल्लेख करत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसांनी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे सुमारे १८ कोटी रुपयांचे घर खरेदी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भात काही व्यक्तींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही उल्लेख केला. व्हीएसआरशी संबंधित २७ कंपन्या असून सुमारे ८८६ कोटी रुपयांचे रोख व्यवहार झाल्याचा दावाही त्यांनी केला. या सर्व व्यवहारांची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांचे व्हीएसआर कंपनीशी संबंध असल्याचा आरोप करत या कंपनीच्या पाठीशी प्रभावशाली व्यक्ती असल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला. मात्र, पत्रकार परिषदेत मांडलेल्या या आर्थिक आणि व्यावसायिक आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
सीआयडीच्या तपासावर नाराजी; सीबीआय चौकशीची मागणी
अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासाबाबत रोहित पवार यांनी राज्याच्या सीआयडीवरही जोरदार टीका केली. कर्नाटकात झिरो एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास आणि पाठपुरावा अपेक्षित पद्धतीने होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. खरात प्रकरणाशी या प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचीही चौकशी झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला.
माहिती अधिकारातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र अपेक्षित माहिती मिळाली नसल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.
दरम्यान, २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान व्हीएसआर कंपनीचे लिअरजेट ४५ विमान कोसळले होते. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. विमान अपघाताचा तांत्रिक तपास एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) करत असून राज्य सीआयडीकडूनही स्वतंत्र तपास सुरू आहे. AAIB ने २८ फेब्रुवारी रोजी प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला होता. मात्र, अंतिम अहवाल अद्याप आलेला नाही.
फडणवीसांकडूनही तपास लवकर पूर्ण करण्याची मागणी!
विशेष म्हणजे, रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर सोमवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाचा मुद्दा उपस्थित केला. पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तपासाला गती देण्याची विनंती केल्याचे सांगितले.
अपघाताला आठ ते दहा महिने उलटून गेले आहेत. विविध देशांतील पथके आणि आंतरराष्ट्रीय यंत्रणाही तपासात मदत करत आहेत. त्यामुळे तपासाचा अहवाल लवकरात लवकर सार्वजनिक व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अपघात होता की त्यामागे अन्य काही कारण होते, हे स्पष्ट झाले पाहिजे. दोषी आढळल्यास कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.
भाजपचा पलटवार; नवनाथ बन यांची रोहित पवारांवर टीका
रोहित पवारांच्या आरोपांना भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले. एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताचा संबंध जोडणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. केवळ एका फोटोच्या आधारे अपघाताचे कनेक्शन जोडता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी रोहित पवार वारंवार पत्रकार परिषदा घेत असल्याची टीका करत त्यांनी आतापर्यंत ठोस पुरावे दिले नसल्याचा दावा केला. या प्रकरणासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून तपास यंत्रणा आपले काम करेल, असेही बन यांनी सांगितले.
एकूणच, रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवत केलेले आरोप, व्हीएसआर कंपनीच्या आर्थिक व्यवहारांबाबत उपस्थित केलेले प्रश्न आणि सीबीआय चौकशीची मागणी यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आता रोहित पवारांनी केलेल्या दाव्यांमधील तथ्य तपास यंत्रणा कधी आणि कसे स्पष्ट करणार, तसेच अंतिम तपास अहवालातून नेमके काय समोर येणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


