लातूर प्रतिनिधी
लातूरच्या सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा देशमुख घराण्याने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते आणि माजी आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने १९ पैकी तब्बल १४ जागा जिंकत बँकेवरील सत्ता कायम राखली. दुसरीकडे भाजपप्रणीत परिवर्तन पॅनलने पाच जागांवर विजय मिळवत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात आपली ताकद दाखवून दिली. मात्र, या संपूर्ण निवडणुकीत दोन निकालांनी सर्वाधिक लक्ष वेधले आहे. भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर आणि आमदार रमेश कराड यांचे पुत्र ऋषिकेश कराड यांनी पहिल्याच प्रयत्नात विजय मिळवत जिल्हा बँकेच्या राजकारणात दमदार प्रवेश केला आहे. त्यामुळे देशमुखांनी सत्ता राखली असली, तरी भाजपच्या नव्या राजकीय पिढीची एन्ट्री आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यातील या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे, या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख यांनी सहकार पॅनलचे नेतृत्व केले, तर भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून देशमुखांच्या वर्चस्वाला आव्हान दिले. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. त्यामुळे ही निवडणूक केवळ जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची न राहता लातूरमधील राजकीय शक्तिप्रदर्शनाची लढाई बनली होती.
१४ विरुद्ध ५; देशमुखांची सत्ता कायम!
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण १९ जागांसाठी ही निवडणूक झाली. त्यापैकी चार जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित १५ जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. या मतदानात ९९९ पैकी तब्बल ९९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच ९९.४ टक्के विक्रमी मतदान झाले. सोमवारी झालेल्या मतमोजणीत सहकार पॅनलने १५ पैकी ११ जागा जिंकल्या, तर परिवर्तन पॅनलने चार जागांवर विजय मिळवला. यापूर्वीच्या बिनविरोध जागांसह सहकार पॅनलच्या खात्यात १४, तर परिवर्तन पॅनलच्या खात्यात पाच जागा जमा झाल्या.
या निकालामुळे धीरज देशमुख यांनी जिल्हा बँकेवरील आपले वर्चस्व कायम राखले आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर जिल्हा बँकेची निवडणूक धीरज देशमुख यांच्यासाठी राजकीय प्रतिष्ठेची बनली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी बँकेची सत्ता राखण्यात मिळवलेले यश महत्त्वाचे मानले जात आहे.
निलंगेकरांच्या घरात काकू-पुतण्याची लढत; पुतण्याने मारली बाजी!
या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा निकाल म्हणजे निलंगा मतदारसंघातील काकू-पुतण्याची लढत. भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांनी आपल्या काकू संगीता अशोक पाटील निलंगेकर यांचा पराभव केला. या विजयामुळे अरविंद पाटील यांनी पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात प्रवेश केला आहे.
या लढतीला केवळ कौटुंबिक संघर्षाचे स्वरूप नव्हते, तर निलंगेकर घराण्यातील राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीनेही ती महत्त्वाची होती. त्यामुळे निकाल जाहीर होताच जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात या विजयाची जोरदार चर्चा सुरू झाली.
कराड घराण्याचीही सहकार क्षेत्रात एन्ट्री!
दुसरा लक्षवेधी निकाल म्हणजे आमदार रमेश कराड यांचे पुत्र ऋषिकेश कराड यांचा विजय. परिवर्तन पॅनलकडून निवडणूक लढवणाऱ्या ऋषिकेश कराड यांनी काँग्रेसचे उमेदवार अशोक गोविंदपुरकर यांचा पराभव केला. पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवत त्यांनी सहकार क्षेत्रात प्रवेश केला आहे. निलंगेकर आणि कराड या दोन्ही राजकीय घराण्यांतील नव्या पिढीच्या या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत भाजपच्या परिवर्तन पॅनलला पाच जागा मिळाल्या असल्या, तरी जिल्हा बँकेत यापूर्वी अत्यल्प प्रतिनिधित्व असलेल्या भाजपला आता संचालक मंडळात ठोस उपस्थिती निर्माण करता आली आहे. त्यामुळे सत्ताधारी पॅनलसमोर आगामी काळात विरोधकांकडून अधिक प्रभावीपणे प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.
महायुतीतच फूट; काँग्रेसला सहकारमंत्र्यांची साथ!
या निवडणुकीतील आणखी एक राजकीय महत्त्वाचा पैलू म्हणजे महायुतीमधील अंतर्गत मतभेद. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती असतानाही लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे वेगळी पाहायला मिळाली. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेसच्या सहकार पॅनलला साथ दिल्याने जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलली. त्यामुळे निलंगेकरांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलला अपेक्षित यश मिळवता आले नाही.
दरम्यान, अरविंद पाटील निलंगेकर यांनी निवडणुकीतील यशाबाबत बोलताना, यापूर्वी जिल्हा बँकेत आमचे प्रतिनिधित्व शून्य होते. आमच्याकडे केवळ १५० मतदार असतानाही मतदारांचा विश्वास संपादन करून आम्ही काही जागा जिंकण्यात यशस्वी झालो, अशी भूमिका मांडली.
आगामी स्थानिक निवडणुकांसाठी राजकीय संकेत!
एकीकडे धीरज देशमुख यांनी जिल्हा बँकेची सत्ता राखून आपले राजकीय वर्चस्व कायम असल्याचे दाखवून दिले, तर दुसरीकडे भाजपने पाच जागा जिंकत सहकार क्षेत्रात आपली ताकद वाढवली आहे. विशेषतः निलंगेकर आणि कराड घराण्यातील तरुण नेत्यांच्या विजयामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
एकूणच, लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत देशमुखांनी सत्ता राखली, निलंगेकरांना अपेक्षित सत्तांतर घडवता आले नाही; मात्र अरविंद निलंगेकर आणि ऋषिकेश कराड यांच्या विजयाने भाजपला भविष्यातील राजकारणासाठी नवे चेहरे मिळाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल हा केवळ सहकार क्षेत्रापुरता मर्यादित नसून लातूरच्या आगामी राजकीय संघर्षाची नांदी ठरण्याची शक्यता आहे.


