मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील ‘जलसा’ बंगल्याबाहेर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या दोन शार्पशूटर्सना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. विकास ठाकूर आणि दीपक सिंह अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही पंजाबमधील जालंधर आणि तरनतारन येथील रहिवासी असून, परदेशातील एका गँगसाठी काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दिल्ली पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
The #Delhi Police Special Cell has arrested two shooters, Vikas Thakur (alias Vicky) and Deep (alias Deepak Singh). Their arrest has thwarted planned shooting attacks targeting a businessman in Delhi and a #Bollywood actor in #Mumbai. Deepak Singh was also wanted in connection… pic.twitter.com/s6iL54I8AM
— Siraj Noorani (@sirajnoorani) November 14, 2026
अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या तीन वेळा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या बंगल्याबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
1984 मधील शीख दंगलीसंदर्भात अमिताभ बच्चन यांनी केलेल्या कथित वक्तव्याचा राग मनात धरून त्यांना लक्ष्य करण्याचा आरोपींचा कट होता, असे सांगितले जात आहे. शनिवारी या दोघांना अटक करण्यात आली.
भीतीच्या वातावरणातही चाहत्यांना अभिवादन
अमिताभ बच्चन दर रविवारी आपल्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर येऊन चाहत्यांचे अभिवादन स्वीकारतात. मागील रविवारी ते बुलेटप्रूफ काचेच्या आडून चाहत्यांना दिसले होते. तिसऱ्यांदा मिळालेली बॉम्बहल्ल्याची धमकी आणि दोन शार्पशूटर्सच्या अटकेमुळे यावेळी ते चाहत्यांना भेटण्यासाठी बाहेर येणार की नाही, याबाबत उत्सुकता होती. मात्र, सुरक्षेच्या चिंतेला न जुमानता अमिताभ यांनी रविवारी नेहमीच्या शैलीत बंगल्याबाहेर येत चाहत्यांना अभिवादन केले.


