मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या तीन वसाहतींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा खर्च पुन्हा वाढणार आहे. जे. पी. नगर (गोरेगाव), आकुर्ली रोड (कांदिवली पश्चिम) आणि बाभई नाका (बोरिवली पश्चिम) येथील वसाहतींच्या पुनर्विकासासाठी आता १८० कोटी ६१ लाख रुपयांचा सुधारित खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. यापूर्वीच्या सुधारित खर्चात २१ कोटी ९० लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
महापालिकेच्या आश्रय योजनेंतर्गत या तीन ठिकाणच्या जुन्या चाळी आणि इमारती पाडून बहुमजली इमारती उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पासाठी सुरुवातीला ९७ कोटी ८१ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, बांधकाम क्षेत्रफळात वाढ झाल्याने जुलै २०२४ मध्ये पहिला फेरफार करण्यात आला. त्यावेळी कंत्राटाची रक्कम १३१ कोटी १७ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली होती.
आता दुसऱ्या फेरफारानुसार कंत्राटाची रक्कम १५० कोटी ४२ लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. इतर आनुषंगिक खर्चासह प्रकल्पाचा एकूण सुधारित खर्च १८० कोटी ६१ लाख रुपये होणार आहे.
प्रकल्पासाठी १० महिन्यांची मुदतवाढ
बांधकाम क्षेत्रफळ वाढल्याने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी १० महिन्यांची मुदतवाढ देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे कामाचा कालावधी २४ महिन्यांवरून ३४ महिने होणार आहे. तसेच, प्रकल्पाचा कालावधी २४ महिन्यांपेक्षा अधिक झाल्याने कंत्राटातील किंमत फरकाची तरतूद पाच टक्क्यांवरून १० टक्के करण्यात आली आहे.
या वाढीव खर्चाच्या प्रस्तावाला स्थापत्य समिती (उपनगरे) आणि स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर पुनर्विकासाच्या कामाला गती मिळणार आहे.


