मुंबई प्रतिनिधी
मुंबई पोलीस दलात महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी घटना समोर आली आहे. पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलचा तब्बल तीन वर्षांपासून लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार आनंद नाईक याच्याविरोधात ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला कॉन्स्टेबलने दिलेल्या तक्रारीनुसार, आनंद नाईक हा गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळी कारणे पुढे करून तिचा मानसिक छळ करत होता. एवढेच नव्हे, तर तो वारंवार तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करत असल्याचा आरोपही महिलेने केला आहे. पोलीस दलातील सहकाऱ्याकडूनच सातत्याने अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागत असल्याने महिला कॉन्स्टेबल मानसिक त्रासाला सामोरी जात होती.
अखेर या छळाला कंटाळून पीडित महिलेने पुढाकार घेत ताडदेव पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी हवालदाराविरोधात अधिकृत तक्रार नोंदवली. या तक्रारीत तिने गेल्या तीन वर्षांपासून होत असलेल्या मानसिक त्रासासह लैंगिक छळाबाबतची माहिती पोलिसांना दिली.
महिला कॉन्स्टेबलच्या तक्रारीची दखल घेत ताडदेव पोलिसांनी हवालदार आनंद नाईक याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार विनयभंग, लैंगिक छळ आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस दलात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्याविरोधातच महिला सहकाऱ्याच्या लैंगिक छळाचा आरोप झाल्याने मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ताडदेव पोलीस करत आहेत.


