कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत महायुतीचे राजेश पाटील यांनी शशिकांत पाटील-चुयेकर यांचा पराभव केला. त्यामुळे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या आघाडीला सत्तेपासून दूर राहावे लागले. या निकालानंतर सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. विशेषतः मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या ‘साम्राज्य उद्ध्वस्त’ करण्याच्या इशाऱ्याला त्यांनी थेट प्रत्युत्तर दिले.
चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यास सतेज पाटील यांचे राजकीय साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल, असे वक्तव्य केले होते. या विधानावर सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत चंद्रकांत पाटील यांना थेट आव्हान दिले.
“चंद्रकांतदादा, सरकारी पदाचा आणि सत्तेचा वापर करून धमक्या देऊ नका. उद्ध्वस्त करतो, बघून घेतो अशा धमक्या माझ्याजवळ चालणार नाहीत. मीसुद्धा पाटील आहे. २०२९ मध्ये कोल्हापूरच्या दहा मतदारसंघांत समोरासमोर लढूया. कार्यकर्त्यांच्या बळावर लढूया. अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाही,” असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांवरही टीका केली. चंद्रकांतदादा मोठे होत असताना त्यांची वैचारिक पातळी खालावत चालली आहे, असा टोला त्यांनी लगावला. स्वर्गीय डॉ. डी. वाय. पाटील यांच्याबद्दल बोलून काय मिळवले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘बंटीचा बंटी साहेब झाला नाही’ या चंद्रकांत पाटील यांच्या टीकेलाही सतेज पाटील यांनी उत्तर दिले. मला लोकांच्या हृदयात बंटी पाटील म्हणूनच राहायचे आहे, साहेब म्हणून नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
गोकुळच्या निवडणुकीतील सत्तासंघर्षावर बोलताना सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही आरोप केले. शासनाची व्यवस्था कशा पद्धतीने वापरता येते, हे मुश्रीफ यांनी दाखवून दिले, असे ते म्हणाले. हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणल्याचा आरोपही त्यांनी केला.
गोकुळमध्ये भविष्यात काही चुकीचे घडल्यास आमचे संचालक त्याला विरोध करतील, असा इशाराही सतेज पाटील यांनी दिला. केवळ सत्ता मिळवण्यासाठी चार जणांची नेमणूक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या संचालकांची नियुक्ती केवळ तीन महिन्यांसाठी करण्यात आल्याची माहिती मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सतेज पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यास सतेज पाटील यांचे साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल, असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी शिक्षणमंत्री म्हणून आदेश दिल्यास बंटी पाटलांचे काहीही शिल्लक राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झालेला हा वाद आता थेट २०२९ च्या विधानसभा निवडणुकीतील राजकीय आव्हानापर्यंत पोहोचला आहे. सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या दहा मतदारसंघांत समोरासमोर लढण्याचे आव्हान दिल्याने दोन्ही नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


