मुंबई प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या राजकारणात दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच आता शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवरूनही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा शिंदे गटातील आमदाराने व्यक्त केली आहे. त्यातच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी खासदार संजय राऊत यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. या भेटीनंतर सरनाईक यांनी केलेल्या सूचक विधानामुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.

‘ठाकरे आणि शिंदे एकत्र आले तर तीच खरी दिवाळी’
शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र यावे, अशी इच्छा शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर शिवसैनिकांसाठी तीच खरी दिवाळी ठरेल, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.
शिवसेनेत फूट पडणे ही दुर्दैवी घटना होती. असा प्रसंग यायला नको होता, अशी खंतही रघुवंशी यांनी व्यक्त केली. त्यांच्या या विधानामुळे दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का, याबाबतच्या चर्चांना नव्याने सुरुवात झाली आहे.
सरनाईक संजय राऊतांच्या घरी का गेले?
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपण संजय राऊत यांची राजकीय भेट घेण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या आईची भेट घेण्यासाठी घरी गेलो होतो, असे स्पष्ट केले. सुनील राऊत आणि संजय राऊत यांच्या आई गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीच्या निमित्ताने आपल्यासाठी लाडू पाठवत असतात. मात्र, मधल्या काळात एका वर्षी आपल्याला भेटायला जाता आले नव्हते.
गेल्या महिन्यात राऊत यांच्या आई पडल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आपण फोन केला असता त्यांनी दिवाळीत घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे आपण संजय राऊत यांना नव्हे, तर त्यांच्या आईला भेटण्यासाठी आलो होतो, असे सरनाईक यांनी सांगितले.
या भेटीत संजय राऊत यांचीही भेट झाल्याबाबत त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. राऊत सकाळी १० वाजता घराबाहेर पडतात, असे आपल्याला वाटले होते. मात्र, ते घरीच असल्याने भेट झाली, असे ते म्हणाले.
‘राजकारणात कधीही काहीही होऊ शकते’
संजय राऊत यांच्याशी झालेल्या भेटीबाबत बोलताना सरनाईक यांनी आपले आणि राऊत यांचे जुने संबंध असल्याचे सांगितले. शिवसेना एकत्र असताना आपण त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे आपले त्यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. अशा भेटी होत राहतात आणि त्यांची चर्चा होणेही स्वाभाविक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय क्षेत्रातील दोन व्यक्ती भेटल्यानंतर राजकीय चर्चा होणारच. आमच्यात चर्चाही झाली; मात्र नेमकी काय चर्चा झाली, हे मी सांगणार नाही, असे सरनाईक यांनी म्हटले.
शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता, राजकारणात कधीही आणि केव्हाही काहीही होऊ शकते, असे सूचक विधान त्यांनी केले. मात्र, सध्या तरी शिवसेनेच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘आमचा एनडीएमध्ये सुखाचा संसार सुरू’
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सरनाईक यांनी आपण एनडीएचे घटकपक्ष असून केंद्र आणि राज्यात चांगल्या पद्धतीने काम सुरू असल्याचे सांगितले. दिल्लीतही आमचा सुखाचा संसार सुरू आहे आणि राज्यातही विकासाच्या माध्यमातून अनेक कामे केली जात आहेत, असे ते म्हणाले.
राज्यात मोठ्या प्रमाणात बहुमत असून विकासाच्या जोरावर अनेक गोष्टी साध्य केल्या जात आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शक्य ती मदत केली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून शिवसैनिकांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार प्रत्येक शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करत असून त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करत आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी जालन्यात एका शेतकऱ्याच्या घरी जाऊन भाकरी आणि पिठलं खाल्ल्याचाही त्यांनी उल्लेख केला. सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनीही शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सध्या आमचे सर्व काही सुरळीत सुरू असून कोणाला सोबत घेण्याची गरज वाटत नसल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
एनडीए आणि महाविकास आघाडीच्या राजकारणाचा दाखला
यावेळी त्यांनी राज्यातील आघाड्यांच्या राजकीय रचनेचाही उल्लेख केला. एनडीएचे घटकपक्ष एकत्र कसे आले, हे सर्वांना माहीत आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीची स्थापना कशी झाली, हेही सर्वश्रुत आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेसच्या विरोधात असलेली शिवसेना आज काँग्रेससोबत आहे, तर एनडीएमध्ये नसलेले काही पक्षही आज त्या आघाडीसोबत काम करत आहेत. त्यामुळे राजकारणात कधीही, कुठेही आणि काहीही घडू शकते, असे सूचक विधान सरनाईक यांनी केले.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा, दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याबाबत व्यक्त होत असलेल्या अपेक्षा आणि त्यातच प्रताप सरनाईक यांची संजय राऊत यांच्या घरी झालेली भेट यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, सध्या शिवसेनेच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नसल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.


