मुंबई प्रतिनिधी
मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या जलद लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या धक्काबुक्कीत एक प्रवासी धावत्या लोकलमधून खाली पडला. सुदैवाने, त्यावेळी लोकल मुंबई सेंट्रल स्थानकाच्या फलाटावरून जात असल्याने तिचा वेग कमी होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
Mumbai local fight, passenger fall out from moving train 🚂 pic.twitter.com/HCL2oEgo55
— Gaurav Patel (@GauravPatel__01) November 7, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान लोकलच्या दरवाजात उभे राहण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक झालेल्या या वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. दोघांमध्ये धक्काबुक्की सुरू असतानाच एक प्रवासी लोकलमधून खाली पडला. या प्रकारामुळे डब्यातील इतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये प्रवाशांमधील हाणामारी स्पष्टपणे दिसत आहे. लोकलमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांमध्ये होणारे वाद यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीही मुंबई लोकलमध्ये चाकूने वार करून मयंक लोहार या तरुणाची हत्या करण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे लोकलमध्ये पाणी शिरत असताना दरवाजा बंद करण्यावरून मयंक आणि आरोपीमध्ये वाद झाला होता. या वादातून संतप्त झालेल्या आरोपीने बॅगेतून चाकू काढून मयंकवर हल्ला केला. त्यात मयंकचा मृत्यू झाला होता. या सलग घटनांमुळे लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.


