कोल्हापूर प्रतिनिधी
घरात लग्नाची लगबग, नातेवाईकांना पत्रिका वाटपाची तयारी, लग्नासाठी हॉल बुकिंग आणि खरेदीची धावपळ… अवघ्या महिनाभरावर लग्न येऊन ठेपल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी पुण्याहून आपल्या गावी निघालेल्या एका तरुणाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या घरात काही दिवसांनी सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते, त्याच घरावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या हृदयद्रावक घटनेने कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
अमेय जोशीचा जागीच मृत्यू
अमेय दीपक जोशी (वय ३२, रा. मुरगूड नाका, कागल) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमेय पुण्यात नोकरी करत होता. दिवाळीचा सण कुटुंबीयांसोबत साजरा करण्यासाठी तो पुण्याहून दुचाकीवरून आपल्या गावी कागलकडे निघाला होता. मात्र, प्रवासादरम्यान उंब्रजजवळ टोलनाक्याच्या दांडक्याला त्याच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात अमेयचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की, त्याच्या हेल्मेटचाही चक्काचूर झाला.
५ डिसेंबरला लग्नाचा मुहूर्त; घरात सुरू होती लगीनघाई!
अमेयच्या आयुष्यातील हा काळ अत्यंत आनंदाचा होता. अवघ्या महिनाभरानंतर, म्हणजेच ५ डिसेंबर रोजी त्याचा विवाह निश्चित झाला होता. घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. नातेवाईकांना निमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिका छापण्यात आल्या होत्या. लग्नाचा हॉल बुकिंग, खरेदी आणि इतर तयारी अंतिम टप्प्यात आली होती. विवाहाच्या धार्मिक विधींनाही सुरुवात झाली होती. कुटुंबीयांसह नातेवाईकांमध्ये लग्नाचा उत्साह ओसंडून वाहत होता.
मात्र, दिवाळीच्या आनंदात सहभागी होण्यासाठी गावी येणाऱ्या अमेयच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्या हातांनी काही दिवसांपूर्वी लग्नपत्रिका वाटण्याची तयारी केली होती, त्याच कुटुंबीयांवर आता अंत्यविधीची वेळ आली. एका होतकरू तरुणाचे आयुष्य अशा दुर्दैवी पद्धतीने संपल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
आनंदाच्या क्षणांची जागा दुःखाने घेतली!
दिवाळीनिमित्त घराकडे परतणाऱ्या अमेयच्या मनातही कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्याचे आणि आगामी विवाहाचे स्वप्न असणार. मात्र, नियतीच्या एका घावाने त्याची सर्व स्वप्ने क्षणात उद्ध्वस्त झाली. महिनाभरावर आलेले लग्न, छापलेल्या पत्रिका आणि घरातील उत्साह या सगळ्यांची जागा आता अश्रूंनी घेतली आहे. या घटनेने जोशी कुटुंबीयांसह कागल परिसरावर शोककळा पसरली आहे.


