विटे : प्रदीप जोशी
सांगली : समाजहितासाठी योगदान देणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची पहिली जबाबदारी आहे. लेंगरे येथील निसर्ग फाउंडेशनचे कार्यकर्ते ही जबाबदारी सातत्याने पार पाडत आहेत, असे प्रतिपादन जीवन प्रबोधिनी महाविद्यालयाच्या कार्यवाह सौ. सोनिया बाबर यांनी केले.
लेंगरे येथे निसर्ग फाउंडेशनच्या वतीने आयोजित गौरी-गणपती सजावट व सार्वजनिक गणेशोत्सव बक्षीस वितरण सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. ग्रामपंचायतीच्या लोकनेते निवृत्तीभाऊ बागल सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
निसर्ग फाउंडेशनच्या माध्यमातून लेंगरेमध्ये सातत्याने समाजहिताची कामे केली जात आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय असतील, तर समाजासाठी निश्चितच चांगले काम उभे राहू शकते, असेही सोनिया बाबर यांनी सांगितले.
जिल्हा परिषद सदस्या मनीषा बागल यांनी घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादाचे कौतुक केले. पर्यावरणपूरक सजावट, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती, हरित संदेश, स्वच्छता आणि सामाजिक विषयांवरील देखावे यातून महिलांनी आपली कल्पकता दाखवून दिल्याचे त्यांनी नमूद केले.
फिरोज शेख यांनी प्रास्ताविकात लेंगरे गावातील गणेशोत्सवाचे महत्त्व सांगितले. गावातील एकोपा हे उत्सवाचे वैशिष्ट्य असून गणेश मंडळांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेत सौ. आशाराणी दिनकर दबडे यांनी प्रथम, सौ. सविता प्रणव चव्हाण यांनी द्वितीय, तर सौ. संचिता देविदास डिगोळे, सौ. जयश्री शहाजी बोबडे आणि सौ. साधना दीपक माळी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. सौ. सुप्रिया सचिन शिंदे व सौ. अक्षदा सुनील माने यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत नागनाथ गणेश मंडळ, लेंगरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. जयभवानी गणेश मंडळ आणि मोरया गणेश मंडळ यांनी विभागून द्वितीय, तर श्री गणेश मित्र मंडळ आणि श्री छत्रपती युवा मंच यांनी विभागून तृतीय क्रमांक मिळवला. क्रांती युवा प्रतिष्ठानला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
घरगुती सजावट स्पर्धेचे पारितोषिक सांगली जिल्हा परिषद सदस्या सौ. मनीषा बागल व युवानेते प्रकाश बागल यांच्या सौजन्याने, तर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे पारितोषिक जिल्हा परिषद सदस्य फिरोजभैय्या शेख यांच्या सौजन्याने देण्यात आले.
सर्व विजेते व सहभागी स्पर्धकांना (कै.) वसंत (आण्णा) रामचंद्र शिंदे यांच्या स्मरणार्थ कृष्णदेव वसंत शिंदे व सर्व सेवा विकास सोसायटीचे संचालक पांडुरंग वसंत शिंदे यांच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपसरपंच एजाज देसाई, सर्व सेवा सोसायटीचे संचालक पांडुरंग शिंदे, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा पाटील, गोल्ड उद्योजक संतोष शिंदे, निसर्ग सखी मंचच्या संचालिका गौरी जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन चंदनशिवे यांनी केले, तर आभार सुवर्णा पाटील यांनी मानले. संस्थेचे सचिव नानासाहेब मंडलिक, सुरज मंडले, साक्षी जाधव, प्रमोद भोसले, भगवान जाधव, दीपक माळी, वैभव सगरे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


