पुणे प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी थेट फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि मित्र विठ्ठल मणियार यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
मणियार यांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. ‘तुम्ही तब्येतीची पूर्ण काळजी घ्या, कशाचीही चिंता करू नका. सुप्रिया सुळे आता उत्तम प्रकारे तयार आहेत, आम्ही सर्व मिळून देश सांभाळू,’ असे मोदी म्हणाल्याचे मणियार यांनी सांगितले. आपुलकीने विचारपूस केल्याबद्दल शरद पवार यांनीही पंतप्रधानांचे आभार मानले.
दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांना कफ आणि तीव्र खोकल्याचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांचा नियोजित दुष्काळ दौरा रद्द करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची नियमित तपासणी करण्यात आली. मोठ्या वैद्यकीय उपचारांची गरज नसून केवळ तपासणी आणि वैद्यकीय सल्ल्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून त्यांना केवळ थोडा अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस ते मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत. त्यानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणे सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहून काम सुरू करतील, अशी माहिती विठ्ठल मणियार यांनी दिली.


