नागपूर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास ज्या सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांनी आपल्या कुशीत जपला, त्याच सह्याद्रीच्या पर्वतरांगा, घनदाट जंगले, नद्या आणि समृद्ध जैवविविधता आज विकासाच्या नावाखाली होणाऱ्या बेसुमार हस्तक्षेपामुळे धोक्यात आली आहे. सह्याद्रीचा नैसर्गिक वारसा उद्ध्वस्त करून महाराजांचे गडकिल्ले नष्ट करण्याचा हा कुटील डाव असल्याचा गंभीर आरोप अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी केला. सह्याद्रीच्या संरक्षणासाठी त्यांनी नागपुरातून ‘सेव्ह सह्याद्री’ या देशव्यापी चळवळीचा शंखनाद केला.
माणसापेक्षा झाडांचा इतिहास मोठा!
नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी, देशाचे मध्यवर्ती शहर आणि संत्रानगरी म्हणून ओळखली जाते. अशा नागपूरच्या भूमीतून सह्याद्रीच्या संरक्षणासाठी सुरू झालेल्या या चळवळीला व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल आणि निसर्गाची हानी थांबवण्याचे आवाहन करताना त्यांनी, माणसांना विस्थापित करा; पण झाडांना विस्थापित करू नका, अशी ठाम भूमिका मांडली. माणसापेक्षा झाडांचा इतिहास मोठा आहे. निसर्गाने हजारो वर्षे जपलेला वारसा काही क्षणांत उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, स्वाभिमानाचा आणि स्वराज्याच्या प्रेरणेचा साक्षीदार असलेला सह्याद्री हा केवळ महाराष्ट्राच्या भूगोलाचा भाग नाही, तर तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि नैसर्गिक वारशाचा अविभाज्य घटक आहे. महाराजांनी गडकिल्ल्यांची उभारणी करताना डोंगररांगा, जंगल, पाण्याचे स्रोत आणि स्थानिक भौगोलिक परिस्थितीचे महत्त्व ओळखले होते. त्यामुळे हा ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा जपणे हीच शिवरायांना खरी मानवंदना ठरेल. प्रत्येक महाराष्ट्रप्रेमीने पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सह्याद्रीच्या संरक्षणासाठी एकजुटीने उभे राहावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.
झाडांसकट संपूर्ण महाराष्ट्रच विकायला काढला!
सरकारच्या विकासाच्या संकल्पनेवर टीका करताना सयाजी शिंदे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत संताप व्यक्त केला. विकासाच्या नावाखाली महाराष्ट्राची फसवणूक सुरू असून झाडांसकट संपूर्ण महाराष्ट्रच विकायला काढला आहे, असा आरोप त्यांनी केला. झाडे ही खरी सेलिब्रिटी आहेत; मात्र त्यांना संपवण्यासाठी ‘झाडखाऊ’ नावाचा व्हायरस निघाला आहे. हा व्हायरस वेळीच रोखून पळवून लावण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
सरकारने एकही झाड तोडले जाणार नाही, अशी ठोस हमी द्यावी आणि दिलेली हमी प्रत्यक्षात पाळावी. अन्यथा सह्याद्री वाचवण्यासाठी सुरू झालेले आंदोलन थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
झाडे तोडली किती, लावली किती, जगली किती?
सरकारकडून वृक्षारोपणाच्या घोषणा केल्या जातात; मात्र आतापर्यंत किती झाडे तोडली, किती नवीन झाडे लावली आणि त्यापैकी प्रत्यक्षात किती झाडे जगली, याचा पारदर्शक हिशेब जनतेसमोर येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सरकारला याचा जाब विचारला पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले.
सह्याद्रीमध्ये विविध प्रकल्पांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे. डोंगर पोखरले जात आहेत. त्यानंतर मोबदल्यात झाडे लावण्याचे केवळ नाटक केले जात आहे. सह्याद्रीचे नुकसान भरून काढण्याच्या नावाखाली केली जाणारी ही वृक्षारोपणाची औपचारिकता म्हणजे जनतेची दिशाभूल असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जंगलांसोबत पाण्याचे स्रोतही संकटात
सह्याद्रीमध्ये केवळ झाडांची कत्तल होत नाही, तर हजारो विहिरी आणि नैसर्गिक जलस्रोतही नष्ट होत असल्याचा गंभीर मुद्दा सयाजी शिंदे यांनी उपस्थित केला. जंगल, डोंगर आणि पाण्याचे स्रोत यांचे परस्परांशी अतूट नाते आहे. हे नैसर्गिक संतुलन बिघडले तर त्याचे गंभीर परिणाम भविष्यातील पिढ्यांना भोगावे लागतील. त्यामुळे विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी देण्याची प्रवृत्ती थांबली पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
‘सेव्ह सह्याद्री’ ही केवळ झाडे वाचवण्याची चळवळ नसून महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा वाचवण्याची लढाई आहे. शिवरायांच्या स्वराज्याची साक्ष देणारा सह्याद्री पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवायचा असेल, तर आता प्रत्येक नागरिकाने या लढ्यात सहभागी होण्याची गरज आहे, असा संदेश या चळवळीच्या माध्यमातून देण्यात आला.


