नांदेड : प्रतिनिधी
नांदेड : शेतकऱ्यांची मायक्रो फायनान्स कंपन्या किंवा खासगी सावकारांकडून बेकायदेशीर अथवा जाचक वसुली करून पिळवणूक केल्यास संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून थेट तुरुंगात पाठवले जाईल, असा कडक इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावर आले असता वाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी आक्रमक भूमिका मांडली.
राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. ही तातडीची मदत असून यानंतर भरीव मदत केली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. विरोधकांनी पसरवलेल्या खोट्या नरेटिव्ह आणि भुलथापांना जनता बळी पडणार नाही. महायुती सरकार सर्वसामान्य आणि कष्टकऱ्यांचे असून विकासकामांतूनच विरोधकांना उत्तर दिले जाईल, असेही ते म्हणाले.


