मुंबई प्रतिनिधी
शिवसेना नेते अजय भोसले यांच्यावर झालेल्या प्राणघातक गोळीबार प्रकरणात कुख्यात गँगस्टर छोटा राजन याच्यासह पाच आरोपींची विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल १७ वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने सर्व आरोपींना खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचणे आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत असलेल्या आरोपांतून मुक्त केले. या निकालामुळे चर्चेत असलेल्या या प्रकरणाला अखेर महत्त्वाचे वळण मिळाले आहे.
विशेष न्यायाधीश नरेंद्रनाथ प्रधान यांनी राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन, पुण्यातील बांधकाम व्यावसायिक सुरेंद्रकुमार अग्रवाल, शाकिब आलम खान, राजेश यादव आणि विजय पुरुषोत्तम साळवी या पाच जणांची निर्दोष मुक्तता केली.
नेमकी घटना काय?
पुण्यात २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना ११ ऑक्टोबर रोजी शिवसेना नेते अजय भोसले यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात भोसले हे निवडणूक प्रचार करत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात भोसले हे थोडक्यात बचावले; मात्र त्यांच्या कारच्या चालकाला गोळी लागून तो जखमी झाला होता. या घटनेने त्यावेळी पुण्याच्या राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
पोलिसांकडून सीबीआयकडे तपास
या गोळीबार प्रकरणाचा सुरुवातीला पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी तपास केला होता. मात्र, २०१५ मध्ये छोटा राजनला इंडोनेशियातून भारतात आणल्यानंतर त्याच्याशी संबंधित अनेक गुन्ह्यांच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली. छोटा राजनविरोधातील अन्य सुमारे ७० प्रकरणांसह अजय भोसले गोळीबार प्रकरणाचाही तपास सीबीआयने हाती घेतला.
अभियोजनाचे दावे, बचाव पक्षाचा युक्तिवाद
खटल्याच्या सुनावणीदरम्यान अभियोजन पक्षाने छोटा राजन हा संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख असल्याचा दावा केला. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि विविध गुन्ह्यांमधील कथित सहभागाचाही उल्लेख करण्यात आला. दुसरीकडे, बचाव पक्षाने या हल्ल्याच्या कटात छोटा राजनचा सहभाग असल्याचे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचा युक्तिवाद केला.
अखेर विशेष सीबीआय न्यायालयाने पाचही आरोपींची सर्व संबंधित आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. तब्बल १७ वर्षांनंतर आलेल्या या निकालामुळे अजय भोसले यांच्यावरील गोळीबार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.


