सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले असताना जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विजयासाठी मतांची जुळवाजुळव आणि राजकीय समीकरणांची जुळवणी करण्यासाठी प्रमुख नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस येथे भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा रंगली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काही जागांवरील लढती अत्यंत चुरशीच्या बनल्या आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी मतांची बेरीज जुळवून आपापली बाजू सुरक्षित करण्यासाठी नेत्यांची धावपळ सुरू आहे. कोणाचे पारडे जड होणार आणि कोणाला धक्का बसणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अशा वातावरणात मंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस येथे सदिच्छा भेट घेतली. मात्र, या भेटीला जिल्हा बँकेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याने राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर जवळपास तासभर चर्चा झाली. मतांची जुळवाजुळव आणि निवडणुकीतील संभाव्य समीकरणे यासाठीच ही भेट असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
या भेटीवेळी आमदार धैर्यशील कदम, महायुतीचे समन्वयक सुनील काटकर, विराज शिंदे, विठ्ठल बलशेटवार, विनीत पाटील आदी उपस्थित होते. त्यामुळे या भेटीत नेमकी कोणती राजकीय गणिते मांडली गेली, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘निदान आमचा भत्ता तरी चालू ठेवा’; उदयनराजेंच्या मिश्किल टिप्पणीने सभेत हशा!
दरम्यान, जिल्हा बँकेच्या कार्यकारी समितीची सभा आज पार पडली. या सभेला खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. संचालक मंडळाच्या सभागृहात प्रवेश करताच ते थेट अध्यक्षांच्या खुर्चीत जाऊन बसले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना उद्देशून त्यांनी, ‘निदान आमचा भत्ता तरी चालू ठेवा,’ अशी मिश्किल टिप्पणी केली. उदयनराजेंच्या या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला.
यावेळी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष अनिल देसाई, प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, प्रदीप विधाते, शिवरूपराजे खर्डेकर, राजेंद्र राजपुरे, कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील यांच्यासह संचालक आणि अधिकारी उपस्थित होते.
एकीकडे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील विजयासाठी राजकीय नेत्यांची जुळवाजुळव सुरू असताना दुसरीकडे जलमंदिर पॅलेसवरील या भेटीने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. आता या भेटीचे राजकीय फलित मतदानातून काय समोर येते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


