मुंबई प्रतिनिधी
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. ‘कांटे’, ‘शूटआऊट ॲट लोखंडवाला’, ‘शूटआऊट ॲट वडाला’ आणि ‘मुंबई सागा’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक संजय गुप्ता यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून, चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, मध्यरात्री सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास संजय गुप्ता घरातील किचनमध्ये घसरून पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. विशेष म्हणजे, त्यांची पत्नी आणि दोन मुले घरातच उपस्थित होती. मात्र, ही घटना नेमकी कशी घडली आणि त्यावेळी काय परिस्थिती होती, याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेकांनी शोक व्यक्त केला. अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर. खान यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली. संजय गुप्ता यांच्याकडे प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान होते, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
‘कांटे’ने दिली वेगळी ओळख; अॅक्शन चित्रपटांचा ठरला चेहरा
संजय गुप्ता यांनी १९९४ मध्ये ‘आतिश’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. मात्र, २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांटे’ या चित्रपटाने त्यांना खरी लोकप्रियता मिळवून दिली. अमिताभ बच्चन, संजय दत्त, सुनील शेट्टी, महेश मांजरेकर, कुमार गौरव आणि लकी अली अशा दिग्गज कलाकारांची फळी या चित्रपटात होती.
गुन्हेगारी विश्व, अंडरवर्ल्ड, सूड, मैत्री आणि ॲक्शन यांचे प्रभावी चित्रण ही त्यांच्या चित्रपटांची खासियत होती. दमदार संवाद, वेगवान कथानक आणि थरारक ॲक्शन सीन्स यांच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली.
‘कांटे’च्या यशानंतर त्यांनी ‘शूटआऊट ॲट लोखंडवाला’, ‘शूटआऊट ॲट वडाला’, ‘जज्बा’, ‘काबिल’ आणि ‘मुंबई सागा’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. हृतिक रोशन आणि यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘काबिल’ चित्रपटही विशेष गाजला. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाचे पडद्यावर वास्तववादी आणि थरारक चित्रण करण्याची त्यांची हातोटी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
अपघातातूनही बचावले होते
काही वर्षांपूर्वी पुणे-मुंबई प्रवासादरम्यान संजय गुप्ता एका गंभीर अपघातातून बचावले होते. या अपघातात त्यांना दुखापत झाली होती. मात्र, उपचारानंतर ते पूर्णपणे बरे झाले होते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी अनु लेखी यांच्याशी विवाह केला होता. काही काळानंतर दोघांचा घटस्फोट झाला; मात्र २००९ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
अॅक्शनपटांना वेगळी ओळख देणारा, मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील कथांना रुपेरी पडद्यावर जिवंत करणारा आणि स्वतःची स्वतंत्र दिग्दर्शकीय शैली निर्माण करणारा एक प्रतिभावान चित्रपट निर्माता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.


