मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी सत्तेचे सोबती असलेले आणि नंतर परस्परांचे कट्टर राजकीय विरोधक बनलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आले आणि राजकीय टोलेबाजीला रंग चढला. ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या विशेष ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मधील सत्तानाट्याची आठवण करून देत उद्धव ठाकरेंना मिश्किल चिमटा काढला. ‘२०१९ पर्यंत उद्धव साहेबांनी जेव्हा जेव्हा बोलावलं, तेव्हा तेव्हा मी गेलो. पण २०१९ मध्ये त्यांचा फोन आलाच नाही. मी वाट पाहत राहिलो,’ असे म्हणत फडणवीस यांनी राजकीय आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या विशेष ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि भाजपचे मंत्री आशिष शेलार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यातील राजकीय संघर्ष, ठाकरे बंधूंची भूमिका आणि विविध मुद्द्यांवरून सुरू असलेली टीका-टिप्पणी या पार्श्वभूमीवर या नेत्यांच्या एकत्र येण्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात फडणवीस यांना २०२९ पर्यंत मुख्यमंत्री राहू द्या, असा मिश्किल टोला लगावला. त्यानंतर अखेरीस भाषणासाठी उभे राहिलेल्या फडणवीस यांनीही आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर देत उपस्थितांना हसवले.
‘२०१९ मध्ये फोनच आला नाही!’
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “सगळेच लोक डाव्या बाजूला गेले म्हणून मी जाणीवपूर्वक उजवीकडे आलो. या प्रकाशनासाठी राज ठाकरेंचा फोन आला होता. राज ठाकरेंनी फोन केला की मुख्यमंत्री फडणवीस येतात, असे आशिष शेलार म्हणाले. पण २०१९ पर्यंत उद्धव साहेबांनी जेव्हा जेव्हा बोलावलं, तेव्हा तेव्हा मी गेलो. त्यांनी कोणत्याही कामासाठी बोलावलं, तरी मी गेलो. पण २०१९ मध्ये त्यांचा फोनच आला नाही. त्यानंतर त्यांनी कधी बोलावलंही नाही. मी वाट पाहत राहिलो.”
फडणवीस यांच्या या विधानातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या संघर्षाचा संदर्भ स्पष्टपणे समोर आला. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेना यांची युती होती. मात्र, निकालानंतर मुख्यमंत्रिपदाच्या वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि अखेर ही युती तुटली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. याच राजकीय घडामोडींची आठवण करून देत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना कोपरखळी मारली.
‘राज ठाकरेंनी माझं ऐकलं होतं; आताचे व्यंगचित्रकार ऐकत नाहीत!’
व्यंगचित्रांच्या प्रभावी कलेचा उल्लेख करताना फडणवीस यांनी आणखी एक किस्सा सांगितला. “शेवटी भाषण करण्याचा एक फायदा असतो. मी काहीही बोललो, तरी राज ठाकरे आज तरी उत्तर देऊ शकणार नाहीत. त्यामुळे माझं बोलणं बॅकफायर होण्याची शक्यता नाही,” असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंनाही मिश्किल टोला लगावला.
ते पुढे म्हणाले, “व्यंगचित्राची कला अशी आहे की एकही शब्द न बोलता पाहिजे तेवढे फटकारे मारता येतात आणि ते योग्य ठिकाणी पोहोचतातही. एखादा अग्रलेख जे सांगतो, तेच एका व्यंगचित्रातून सांगता येते. आम्ही राजकारणी म्हणजे व्यंगचित्रकारांसाठीचे ऑब्जेक्ट आहोत. आम्हाला कोणीही काढून देतं; पण ते कसंही असलं, तरी छान वाटतं.”
यानंतर त्यांनी स्वतःच्या व्यंगचित्राचा संदर्भ देत उपस्थितांना हसवले. “मी राज साहेबांना सांगितलं होतं की माझं व्यंगचित्र काढताना काहीही मोठं काढा, पण पोट मोठं काढू नका. त्यांनी माझं ऐकलं होतं. मात्र, अलीकडच्या व्यंगचित्रकारांनी माझं काही ऐकलं नाही,” असे फडणवीस म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याची लाट उसळली.
‘चांगल्या कामासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो’
या कार्यक्रमात ठाकरे बंधू आणि आपण एकाच व्यासपीठावर आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. “या मंचावर आम्ही एकत्र येणार, याचं लोकांना आश्चर्य का वाटलं, हे मला माहीत नाही. मला तरी त्याचं आश्चर्य वाटलं नाही. चांगल्या कामासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो,” असे ते म्हणाले.
मुंबईत व्यंगचित्रकारांसाठी स्वतंत्र दालन उभारण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. या उपक्रमासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मदत घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. व्यंगचित्रकलेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय वास्तवावर भाष्य करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
भाषणाच्या शेवटी फडणवीस यांनी पुन्हा एकदा राजकीय कोपरखळी मारली. “प्रत्येकाची जमेची बाजू असते. हे व्यंगचित्र छान काढतात, ते छायाचित्र छान काढतात. मी राजकारणात आहे, त्यामुळे त्यांनी मला ते करू द्यावं,” असे म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंना मिश्किल संदेश दिला.
२०१९ च्या सत्तासंघर्षाच्या आठवणी, राज ठाकरेंची मुख्यमंत्रिपदाबाबतची टोलेबाजी आणि फडणवीस यांचे विनोदी प्रत्युत्तर यामुळे ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’च्या प्रकाशन सोहळ्याला राजकीय रंग चढला. वैचारिक आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एकत्र आलेल्या या नेत्यांच्या उपस्थितीपेक्षा त्यांच्या मिश्किल संवादांचीच अधिक चर्चा रंगली.


