मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील विक्रोळीच्या टागोर नगर परिसरातील खासगी शिकवणी वर्गात १२ वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पाचवीत शिकणाऱ्या मुलीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतरही संबंधित क्लास सुरू असल्याचे समोर आल्याने परिसरात संताप व्यक्त करण्यात आला.
टागोर नगर येथील ‘एस. के. क्लासेस’मधील शिक्षकावर हा आरोप करण्यात आला आहे. सोमवारी रात्री भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते क्लासबाहेर जमले. त्यांनी शिकवणी वर्ग तातडीने बंद करण्याची मागणी करत जोरदार निदर्शने केली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. वाढत्या विरोधानंतर अखेर क्लास बंद करण्यात आले.
या प्रकरणाची माहिती मिळताच भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी रात्रीच विक्रोळी पोलीस ठाण्यात भेट दिली. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. संबंधित क्लासचालकावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
या प्रकरणी विक्रोळी पोलिसांकडून आरोपी शिक्षकाची चौकशी सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.


