पुणे प्रतिनिधी
पुणे : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीदरम्यान बालेवाडी येथील केंद्रावर आठ मतपेट्यांना अधिकृत सील नसल्याचा आक्षेप घेण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला. महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी यावर आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारला. या प्रकारामुळे निवडणूक अधिकारी, कर्मचारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाला.
मतमोजणीच्या प्राथमिक फेऱ्या सुरू असताना काही मतपेट्या तपासणीसाठी टेबलवर आणण्यात आल्या. त्यावेळी आठ मतपेट्यांवर निवडणूक आयोगाचे अधिकृत सील नसल्याचा दावा महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी केला. या मतपेट्या मतमोजणी केंद्रात कशा आल्या, असा सवाल उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केला.
या प्रकारामुळे केंद्रावरील वातावरण तणावपूर्ण झाले. आक्षेपांची पडताळणी करण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया काही काळासाठी स्थगित केली.
दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले असून, दोन्ही उमेदवारांसाठी ही लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे.


