पुणे प्रतिनिधी
पिंपरी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर १ नोव्हेंबर २०२६ पासून सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना कायमस्वरूपी बंदी लागू होणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, याबाबतची अधिसूचना अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंके यांनी प्रसिद्ध केली आहे.
मिसिंग लिंक १ मे २०२६ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, बोगद्यातून जाणाऱ्या मालवाहू वाहनांमुळे अपघात घडल्याने वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर संबंधित विभागांशी चर्चा करून मालवाहू वाहनांना या मार्गावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्वलनशील, स्फोटक आणि अन्य धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही या मार्गावर प्रवेश करता येणार नाही.
मालवाहू आणि अवजड वाहनांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या जुन्या मार्गिकेचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे. खासगी मोटार, जीप, हलकी मोटार वाहने आणि प्रवासी बस यांना मात्र मिसिंग लिंकवरून प्रवास करता येणार आहे.
या मार्गावर खासगी मोटार आणि इतर मोटार वाहनांसाठी ताशी १०० किलोमीटर, तर प्रवासी बस व अन्य प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
बोगद्याची रचना, तांत्रिक बाबी आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे महामार्ग पोलीस, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले. वाहनचालकांनी प्रवासापूर्वी आपल्या वाहनाला मिसिंग लिंकवर प्रवेशाची परवानगी आहे की नाही, याची खात्री करावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


