पुणे प्रतिनिधी
पुणे : पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सुखसागरनगर परिसरात एका १८ वर्षीय तरुणीला त्रास देत तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. तरुणीने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर तिची मैत्रीण आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
शेजारून आला अन् थेट अंगाला हात लावला!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित १८ वर्षीय तरुणी सुखसागरनगर परिसरातील समर्थ डेअरीसमोर आपल्या मैत्रिणीची वाट पाहत उभी होती. त्याचवेळी आरोपी तिच्याजवळ आला. त्याने तरुणीच्या अंगाला हात लावून तिचा शर्ट ओढला आणि तिला जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी घाबरली. तिने तातडीने मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.
तरुणीचा आवाज ऐकून तिची मैत्रीण घटनास्थळी धावून आली. तिने आरोपीला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तरुणी खाली पडली आणि तिच्या हाताला दुखापत झाली. मात्र, एवढे होऊनही आरोपीने तरुणीला घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरूच ठेवल्याचे तिने सांगितले.
नागरिकांनी धाव घेत आरोपीला पकडले
तरुणीच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी आरोपीला रोखून धरत त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी आरोपीने नागरिकांनाही मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच एका व्यक्तीचा मोबाईल जमिनीवर फेकून तो फोडल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपीचे नाव जितु किशोरीलाल सरोज (वय ३०, मूळ उत्तर प्रदेश) असे आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे घटनेची चर्चा
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने परिसरात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भररस्त्यात तरुणीशी गैरवर्तन करून तिला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न झाल्याने सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गर्दीच्या परिसरातही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.


