पुणे प्रतिनिधी
पिंपरी : इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ डिलीट करावा लागल्याच्या रागातून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याच वर्गातील विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २३) दुपारी सव्वादोनच्या सुमारास महाळुंगे येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या परिसरात घडली. या हल्ल्यात विद्यार्थिनी जखमी झाली असून, तिची प्रकृती स्थिर आहे. हल्ला करणाऱ्या विधिसंघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संबंधित शाळेची सहल १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी पाचगणी-महाबळेश्वर येथे गेली होती. या सहलीदरम्यान मुली नृत्य करत असतानाचा व्हिडिओ नववीतील एका विद्यार्थ्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडिओवरून विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला व्हिडिओ डिलीट करावा लागला होता. याच घटनेचा राग मनात धरून त्याने विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.
जखमी विद्यार्थिनीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच बावधन पोलिसांनी तपास सुरू केला. विद्यार्थिनीचा जबाब नोंदविण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हल्ल्यामागील नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, या घटनेबद्दल शाळेने दुःख व्यक्त केले आहे. जखमी विद्यार्थिनीला प्रथमोपचार देऊन रुग्णालयात हलविण्यात आले असून, तिच्या कुटुंबीयांना आवश्यक सहकार्य केले जात आहे. चौकशीत शाळा संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत असून, विद्यार्थ्यांना भावनिक आधार देण्यासाठी समुपदेशकांची मदत घेतली जात आहे. घटनेची गंभीर दखल घेत संबंधित विद्यार्थ्याला शाळेच्या शिस्तविषयक नियमांनुसार शाळेतून काढून टाकण्यात आल्याचे शाळेने निवेदनात स्पष्ट केले आहे.


