बांद्रे पश्चिमेत गुन्हे शाखेची कारवाई; दुसरा आरोपी फरार, शोध सुरू
स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : अंमली पदार्थ विक्रीविरोधात कारवाई करत मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने बांद्रे पश्चिम येथील एका घरावर छापा टाकून १ किलो ५०५ ग्रॅम चरस जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार या चरसची किंमत सुमारे दीड कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून, अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.
२४ ऑक्टोबर रोजी संबंधित व्यक्ती आपल्या घरातून अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने पंचांच्या उपस्थितीत घरावर छापा टाकला. या कारवाईत चरस जप्त करण्यात आला. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला असून, या प्रकरणातील दुसऱ्या पाहिजे आरोपीचा शोध सुरू आहे.


