स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : बोरिवली पूर्व परिसरात मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने कारवाई करत १ किलो २८ ग्रॅम (१.०२८ किलो) एमडी अर्थात मेफेड्रॉन जप्त केले. या अंमली पदार्थाची किंमत ३ कोटी ८ लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी खुनाच्या गुन्ह्यातील तीन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
२५ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना बोरिवली पूर्व येथील नॅशनल पार्कसमोरील पश्चिम द्रुतगती मार्गावर, श्री कृष्णा कॉम्प्लेक्सच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही कारवाई करण्यात आली. एमडी विक्रीसाठी जवळ बाळगल्याच्या संशयावरून पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्यांच्याकडून १ किलो २८ ग्रॅम मेफेड्रॉन मिळून आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये २८ वर्षांच्या दोन आणि ३९ वर्षांच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. चौकशीदरम्यान या तिघांनी नालासोपारा येथून अंमली पदार्थ आणून विक्रीसाठी मुंबईत आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौगुले-शृंगी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक अभिजीत अहिरराव, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक पंकज पाटील, संदीप रहाणे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.


